पिंपरी महापालिकेच्या सर्व जीममध्ये महिलांसाठी स्वतंत्र जीम सुरू होणार; महिला व बालकल्याण समितीचा ठराव

75

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहराच्या चोहोबाजूंनी असणाऱ्या व्यायामशाळांमध्ये आता महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा (जीम) सुरू करण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभेत बुधवारी (दि. २१) त्याबाबतचा ठराव करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या २०९ बालवाड्यांतील सर्व बालकांना महापालिकेमार्फत स्कूल बॅग व पाटी देण्यासही समितीने मंजुरी दिली आहे.

समितीच्या सभापती सुनीता तापकीर सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. महापालिकेने शहराच्या वेगवेगळ्या भागात ७२ व्यायामशाळा उभारल्या आहेत. शहरातील नागरिकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी. तसेच त्यांचे आरोग्य चांगले राहावे, या उद्देशाने या व्यायामशाळा उभारण्यात आल्या आहेत. परंतु, या व्यायामशाळांवर नगरसेवक व त्यांच्या बगलबच्च्यांच्या संस्थांनी कब्जा मिळविला आहे. अनेक व्यायामशाळा बंद अवस्थेत आहेत. सुरू असलेल्या व्यायामशाळांमध्ये साहित्य उपलब्ध नाही, अशी परिस्थिती आहे.

महापालिकेच्या काही मोजक्याच व्यायामशाळा व्यवस्थितपणे सुरू आहेत. त्याचा नागरिकांनाही उपयोग होत आहे. आता महापालिकेच्या या व्यायामशाळांमध्येच महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा सुरू करण्यात येणार आहेत. महिला व बालकल्याण समितीच्या सभेत बुधवारी त्याबाबतचा ठराव करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील महिलांनाही व्यायामांसाठी हक्काची जागा उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे महापालिकेच्या २०९ बालवाड्यांमधील बालकांना महापालिकेमार्फत मोफत स्कूल बॅग व पाटी देण्यासही या समितीने मंजुरी दिली आहे.