पिंपरी महापालिकेच्या शिक्षण मंडळ सभापतीपदासाठी भोसरीतील प्रा. सोनाली गव्हाणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

111

भोसरी, दि. ५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समिती सभापतीपदासाठी भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उच्चशिक्षित नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज गुरूवारी (दि. ५) दाखल करण्यात आला. तसेच उपसभापतीपदासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या नगरसेविका शर्मिला बाबर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. त्यामुळे महापालिकेत नगरसेवकांचा समावेश असलेल्या शिक्षण समितीच्या पहिल्या सभापती होण्याचा मान गव्हाणे यांना मिळणार आहे.

आता सोमवारी (दि. ९) शिक्षण समिती सभापती आणि उपसभापतीपदासाठी निवडणुकीची औपचारिकता पार पाडली जाणार आहे. या दोन्ही पदासाठी गुरूवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस होता. महापालिकेत आणि शिक्षण समितीत भाजपचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे या दोन्ही पदावर भाजपच्या नगरसेवकांची वर्णी लागणार हे निश्चित होते. परंतु, शिक्षण समितीचा पहिला सभापती होण्याचा मान कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता होती.

शिक्षण समितीत भाजपचे संख्याबळ पाच आहे. पक्षाने पाचही जागांवर नगरसेविकांची निवड केली. त्यामुळे या पाच नगरसेविकांपैकी कोणाला सभापती होण्याचा मान मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भोसरी विधानसभा मतदारसंघातील उच्चशिक्षित नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे यांचे पारडे जड मानले जात होते. पक्षानेही गव्हाणे यांच्या रुपाने शिक्षण समिती सभापतीपदी एका उच्चशिक्षित नगरसेविकेला संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शिक्षण समिती सभापदीपदासाठी नगरसेविका गव्हाणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे उपसभापतीपदासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेविका शर्मिला बाबर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता या दोघांचीही या पदावर निवड झाल्याची सोमवारी अधिकृत घोषणा होईल.