पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने स्थायी समितीत स्वपक्षाच्या सर्वच नगरसेवकांना संधी देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यानुसार राजीनामा मंजूर केलेल्या स्थायी समितीतील पाच नगरसेवकांच्या जागेवर मंगळवारी (दि. २०)  झालेल्या सर्वसाधारण सभेत नवीन पाच नगरसेवकांची वर्णी लावण्यात आली. त्यामध्ये भाजपच्या नगरसेविका सारिका लांडगे, अर्चना बारणे, यशोदा बोईनवाड, नगरसेवक विकास डोळस, तर अपक्ष नगरसेविका साधना मळेकर  यांचा समावेश आहे.

महापौर नितीन काळजे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सत्ताधारी भाजपने स्थायी समितीमध्ये पाच वर्षात स्वपक्षाच्या तब्बल ५५ नगरसेवकांना संधी देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार पहिल्या वर्षी स्थायी समितीत स्थान मिळालेल्या सर्वच नगरसेवकांचे राजीनामे घेण्यात आले होते. त्यानंतर स्थायी समितीतून निवृत्त करण्यात येणाऱ्या आठ सदस्यांसाठी चिठ्ठी काढण्यात आली. त्याद्वारे भाजपच्या सीमा सावळे, आशा धायगुडे-शेंडगे, उषा मुंढे, कोमल मेवानी, हर्षल ढोरे, कुंदन गायकवाड हे सहा नगरसेवक स्थायी समितीतून निवृत्त झाले. या समितीत भाजपच्या नगरसेवकांची संख्या ११ आहे. त्यापैकी भाजपला पाठिंबा दिलेल्या अपक्ष नगरसेवकांसाठी स्थायी समितीची एक जागा देण्यात आली आहे.

चिठ्ठीद्वारे सहा नगरसेवक निवृत्त झाल्यानंतर भाजपचे पाच नगरसेवक स्थायीमध्ये कायम होते. परंतु, या समितीत सर्वांना संधी देण्याच्या धोरणानुसार उर्वरित पाचही नगरसेवकांचे ९ मार्च रोजी राजीनामे मंजूर करण्यात आले होते. त्यामध्ये लक्ष्मण उंडे, उत्तम केंदळे, माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे आणि अपक्षांचे गटनेते कैलास बारणे यांचा समावेश होता. या पाच नगरसेवकांच्या जागेवर नवीन भाजपच्याच नवीन नगरसेवकांची स्थायी समितीत वर्णी लावणे गरजेचे होते. त्यानुसार मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीत निवड केलेल्या पाच नगरसेवकांची नावे जाहीर करण्यात आली.

त्यानुसार भाजपच्या सारिका लांडगे, अर्चना बारणे, यशोदा बोईनवाड, नगरसेवक विकास डोळस, तर अपक्ष नगरसेविका साधना मळेकर    यांची स्थायी समितीत वर्णी लावण्यात आली आहे. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी या पाच नगरसेवकांची नावे बंद पाकीटातून महापौर नितीन काळजे यांच्याकडे सुपूर्त केली. त्यानंतर महापौर काळजे यांनी पाकीटात नावे असलेल्या पाच नगरसेवकांची स्थायी समितीत निवड केल्याचे जाहीर केले. त्यामुळे स्थायी समितीत भाजपचे सर्व ११ नगरसेवक नवीन असतील, तर राष्ट्रवादीचे मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ आणि शिवसेनेचे अमित गावडे हे समितीचा एक वर्षांचा कारभार पाहिलेले जुने सदस्य असतील.