पिंपरी महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपच्या ममता गायकवाड; राष्ट्रवादीचा दारूण पराभव, शिवसेना तटस्थ

81

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपच्या ममता गायकवाड यांचा विजय झाला. ममता गायकवाड यांना ११ मते, तर राष्ट्रवादीचे उमेदवार मोरेश्वर भोंडवे यांना चार मते मिळाली. या निवडणुकीत शिवसेनेचा एक सदस्य तटस्थ राहिला. त्यामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रंगत निर्माण केलेल्या राष्ट्रवादीचा फुगा फुटला.

स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी महापालिकेत निवडणूक प्रक्रिया पार पडली. विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि प्रकल्पाचे संचालक सुशील खोडवेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. खोडवेकर यांनी दुपारी बारा वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरूवात केली. त्यांनी सुरूवातीला स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी केली. भाजपच्या ममता गायकवाड आणि राष्ट्रवादीचे मोरेश्वर भोंडवे यांनी दिलेल्या प्रत्येकी चार-चार अर्जांची छाननी करण्यात आली.

अर्ज छाननीत दोघांचेही अर्ज वैध ठरले. त्यानंतर खोडवेकर यांनी उमेदवारी अर्ज माघारीसाठी १५ मिनिटांची मुदत दिली. या मुदतीत राष्ट्रवादीच्या मोरेश्वर भोंडवे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. त्यात भाजपच्या ममता गायकवाड यांना ११ मते, तर राष्ट्रवादीच्या मोरेश्वर भोंडवे यांना ४ मते मिळाली. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी जातीने हजर राहिलेली शिवसेना मात्र या निवडणुकीत तटस्थ राहिली. शिवसेनेचे स्थायीतील सदस्य अमित गावडे यांनी मतदान केले नाही.

भाजपच्या ममता गायकवाड यांना ११ मते (भाजपची १० आणि अपक्ष १) मिळाल्यामुळे त्यांची स्थायी समिती अध्यक्षपदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुशील खोडवेकर यांनी जाहीर केले. त्यामुळे या निवडणुकीत रंगत आणलेल्या आणि घोडेबाजाराच्या जोरावर चमत्कार घडण्याचा आशावाद बाळगलेल्या राष्ट्रवादीचा फुगा फुटला.