पिंपरी महापालिका कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करु – आमदार लक्ष्मण जगताप

153

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना अंशदान पेन्शन देण्यात येते. यामुळे या कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षितता धोक्यात आली आहे. नविन व जुन्या कर्मचाऱ्यांमध्ये आर्थिक विषमता निर्माण होत आहे. त्यांचे होणारे आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी नविन परिभाषीत अंशदान निवृत्ती वेतन योजना रद्द करुन महापालिकेमध्ये लागू असलेली जुनी पेन्शन योजना पुर्ववत सुरु करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार लक्ष्मण जगताप यांनी रविवारी (दि. १३) दिले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने थेरगाव येथील कैलास मंगल कार्यालयात कर्मचाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी महापौर राहुल जाधव, उपमहापौर सचिन चिंचवडे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे, महासचिव चारुशिला जोशी, नितीन समगीर, मनोज माछरे, आबा गोरे, अतुल आचार्य, महाद्रंग वाघेरे, मुकुंद वाखारे, शिवाजी येळवंडे, अनिल लखन, दिगंबर चिंचवडे, पांडुरंग मस्के, संजय कापसे, रामेश्वर पवार, दिलीप गुंजाळ, सुनिल विटकर, विशाल भुजबळ, महादेव बोत्रे, नंदकुमार घुले, बालाजी अय्यंगार, हनुमंत चाकणकर, सुधीर वायदंडे, गौतम भालेराव, राजाराम चिंचवडे, मोहीद्दीन तांबोळी, उत्तम गंगावणे, नथा मातेरे, प्रितम बावीस्कर, दत्तात्रय ढगे, राकेश चव्हाण, सविता निगडे, सुभाष लांडे, चंद्रकांत कांबळे, निलेश कांबळे, दत्तात्रय हाटकर, उमेश बांदल, यशवंत देसाई, किशोर आठवाल, रमेश लोंढे, धनंजय जाधव, मंगल सातकर यांच्यासह मनपातील सर्वच विभागातील जवळपास शेकडो कर्मचारी उपस्थित होते.

बबन झिंजुर्डे म्हणाले, “१ नोव्हेंबर २००५ नंतर मनपा सेवेत रुजु झालेल्या अधिकारी, कर्मचारी यांना महाराष्ट्र शासन वित्त विभागाकडील दिनांक ३१ ऑक्टोबर २००५ च्या शासन निर्णयानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नविन परिभाषीत अंशदान निवृत्ती वेतन योजना मनपा अधिकारी, कर्मचारी यांना लागू करण्यात आली आहे. तथापि या संदर्भात सदर योजना स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू करण्याबाबत संदिग्धता असल्यामुळे व मनपा सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना सदर योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ मिळालेले नाहीत. दिनांक ९ जानेवारी २०१९ रोजी नविन परिभाषीत अंशदान निवृत्ती वेतन योजना लागु असलेल्या कर्मचाऱ्यांनी सदरची योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणेकामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाकडे अर्ज केल्याने या योजनेतील तरतुदींचा अभ्यास करुन उपरोक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. राज्यातील काही महानगरपालिकांनी माहिती अधिकारांतर्गत अंशदान पेन्शन योजनेबाबत शासनाकडे माहिती मागविली असता सदर योजना ही स्थानिक स्वराज्य संस्थाना लागु नसलेबाबत शासनाने कळविले आहे. वास्तविक पहाता मनपातील कर्मचाऱ्यांना अंशदान पेन्शन योजना लागु करणे संबंधी मनपाच्या सर्वसाधारण सभेमध्ये कोणत्याही प्रकारची मंजुरी न घेता सदरची योजना मनपा कर्मचाऱ्यांना एकतर्फी लागु केल्याने सदर कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षीतता धोक्यात येवुन कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत लांडगे यांनी केले. मनोज माछरे यांनी आभार मानले.