पिंपरी मनपा स्थायी समितीच्या बैठकीत 32.75 कोटींच्या विकासकामांना मंजूरी : ॲड. नितीन लांडगे

64

– पीएमपी संचलन तुटसाठी 55 कोटी, पोलिस आयुक्तालयाला देणार 50 स्मार्ट मोटर सायकल

पिंपरी, दि. 27 (पीसीबी) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत कोविड काळात अनेक कुटूंबांतील कमावत्या व्यक्तींचे निधन झाले आहे. अशा प्रत्येक कुटूंबियांना अर्थ सहाय्य म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका 25 हजार रुपये देत आहे. परंतू यासाठी निधन झालेल्या व्यक्तीचे वय 50 वर्षे असावे अशी अट होती. ही अट रद्द करावी अशी मागणी स्थायी समिती सदस्या भीमाताई फुगे यांनी बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत केली. याला स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांच्यासह सर्व सदस्यांनी अनुमोदन देत यामधील निधन व्यक्तींच्या वयाची अटच रद्द करावी अशी मागणी केली. सदस्यांची हि मागणी आयुक्त राजेश पाटील यांनी मान्य केली. तसेच कोविड काळात झालेल्या लॉकडाऊन मुळे अनेक कुटूंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. यातील अनेक कुटूंबियांना त्यांच्या पाल्यांची शालेय फी भरणे शक्य होत नाही. अशा कुटूंबियांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून प्रत्यक्ष काही अर्थ सहाय्य द्यावे अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी केली. याला देखिल सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले. आयुक्त राजेश पाटील यांनी देखिल याबाबत सकारात्मक भुमिका घेत माहिती घेऊन लवकरच निर्णय घेऊ असे सांगितले.

बुधवारी (दि. 27 ऑक्टोबर) स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली कै. मधुकरराव पवळे सभागृहात स्थायी समितीची 245 व 246 वी बैठक झाली. या दोन्ही बैठकांमधील एकूण 75 विषयांपैकी 59 विषय मंजूर करण्यात आले. तर ऐन वेळच्या 23 विषयांनाही मंजूरी देण्यात आली. विकास कामे व इतर ऐनवेळच्या विषयांसह एकूण 32 कोटी 75 लाख 57 हजार 441 रुपये आणि पीएमपीएलच्या संचलन तुटीपोटी रुपये 55 कोटी देण्यासाठी मंजूरी देण्यात आली. अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

तसेच पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाकडून देण्यात आलेल्या प्रस्तावानुसार पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात वाढलेल्या लोकसंख्येमुळे गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलिसांना पेट्रोलिंग करण्याची आवश्यकता आहे. यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शंभर पल्सर दुचाकी देण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार पोलिसांना पेट्रोलिंगसाठी 50 स्मार्ट मोटर सायकल महाराष्ट्र शासनाच्या जेम पोर्टल वरील इ – स्टोअर मधून त्या वेळच्या दरानुसार बजाज पल्सर 150 डिटीएसआय मोटर सायकल खरेदी करण्यासाठी मान्यता देण्यात आली. यासाठी कोविड काळात मनपा व शहर पोलिसांच्या संयुक्त मोहिमेमार्फत मास्क न वापरणा-या, विना परवाना अनावश्यक फिरणा-या नागरिकांकडून दंडात्मक कारवाई म्हणून 2 कोटी 34 लाख रुपये वसूल करण्यात आले आहे. या निधीतून ही खरेदी करण्यासाठी 94 हजार 850 रुपये एका मोटर सायकलच्या दरानुसार एकूण 50 मोटर सायकल खरेदी करण्यासाठी 47 लाख 42 हजार 400 रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या स्मार्ट बाईकसोबत दोन माईक, सायरन, ब्लिंकर्स, फ्लॅश लाईट, कॅमेरा, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टिम, जॅमर होल्डर, हेल्मेट सह हेल्मेट होल्डर अशा सुविधा असणार आहेत अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे. 

WhatsAppShare