पिंपरी पोलिसांची मोठी कारवाई: एकाच वेळेस १८ गुन्ह्यांचा उलगडा; १४ आरोपींना अटक; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

1907

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – पिंपरी पोलिसांनी चार प्रकरणांच्या चौकशी दरम्यान एकाच वेळेस तब्बल १४ गुन्ह्यांचा छडा लावून १४ आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल १४ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये रोख रक्कम, सोने, वाहन, मोबाईल, देशी कट्टा आणि गावठी पिस्टलचा समावेश आहे.

पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या प्रकरणात मंगळवार (दि.४) पिंपरीतील रमाबाईनगर पुलाजवळ भरत जैन या व्यापाऱ्याला अडवून धमकी देत त्यांच्या ताब्यातील दुचाकी आणि त्यातील रोख १ लाख ७५ हजार रुपये चौघाजणांनी जबरदस्ती चोरुन नेली होती. यावर पिंपरी पोलिस ठाण्यातील तपास पथकाने आकुर्डीतील खंडोबा माळ येथून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दुचाकीरील संशयीत आरोपी नजीर शेख (वय २३) आणि मस्तान कुरेशी (वय २३, दोघे.रा. देहूरोड)  या दोघांना अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता हा गुन्हा दहा जणांनी मिळून केला असल्याची माहिती त्यांनी पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्यानुसार सापळा रचून सलमान शेख (वय २२), रफिक शेख (वय १९), सिद्दीक शेख (वय २३), नियाज शेख (वय २१), नवशाज शेख (वय २०, सर्व रा. देहूरोड) या पाच आरोपींना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून ३ मोटार सायकल, ४ मोबाईल, एक कार, सोन्याचे दागिने असा एकुण ५ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असून पाच गुन्ह्यांचा उलगडा केला आहे.

दुसऱ्या प्रकरणात घरफोडी गुन्ह्यातील आरोपी सतिश दुशिंग (वय २०, रा. घरकुल चिखली)  याला अजमेरा येथून पिंपरी पोलिसांनी अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे दोन साथीदार विकास घोडके (वय २१, वडगाव शेरी) आणि कुलदिप शिंदे (वय २०, रा. चंदननगर, पुणे) यांच्यासोबत मिळून पिंपरी, भोसरी आणि चिंचवड येथे एकूण पाच गुन्हे केल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्याच्याकडून ६ लाख ६५ हजार रुपये किमतीचे एकुण २० तोळे सोन्याचे दागिने जप्त केले.

तिसऱ्या प्रकरणात गुरुवारी (दि.६) पिंपरी पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सलमान शेख (वय २४, रा. मिलिंदनगर, पिंपरी) याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तब्बल १ लाख ५५ हजारांच्या पाच दुचाक्या जप्त करुन ५ गुन्हे उघडकीस आणले. तर संततुकारामनगर चौपाटी येथून घरफोडी प्रकरणातील आरोपी राहुल भांडेकर (वय २०, रा. गांधीनगर खराळवाडी) याला अटक करुन एकूण १३ हजार रुपयांचा मोबाईल आणि एक घड्याळ असा एकून १३ हजारांचा मुद्देमाल जप्त करुन १ घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला.

तसेच चौथ्या प्रकरणात गुरुवारी (दि.६) रात्री उशीरा पिंपरी येथील कोंबींग ऑपरेशन करत असताना राहुल उर्फ भडज्या अर्जन गोरे (वय २४, रा. शिवले चाळ, वाल्हेकरवाडी, चिंचवड) या तडीपार गुंडाला अटक करुन त्याच्याकडून ७ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त केला. तसेच रामनगर येथून तडीपार इसम स्वप्नील उर्फ बाळु नामदेव शेलार (वय २६, दत्तनगर, चिंचवड) याला अटक करुन एकुण ३१ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

अशाप्रकारे पिंपरी पोलिसांनी चार प्रकरणांच्या चौकशी दरम्यान एकाच वेळेस तब्बल १४ गुन्ह्यांचा छडा लावून १४ आरोपींना अटक केली. तसेच आरोपींकडून तब्बल १४ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये रोख रक्कम, सोने, वाहन, मोबाईल, देशी कट्टा आणि गावठी पिस्टलचा समावेश आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उप निरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस हवालदार राजेंद्र भोसले, शाकीर जिनेडी, नागनाथ लकडे, पोलीस नाईक महादेव जावळे, श्रीकांत जाधव, संतोष दिघे, राजू जाधव, पोलीस शिपाई संतोष भालेराव, रोहित पिंजरकर, उमेश वानखेडे, विद्यासागर भोते, अविनाश देशमुख, गणेश खाडे, नामदेव राऊत, गणेश करपे, सोमेश्वर महाडिक, विकास रेड्डी, विष्णू भारती, महिला पोलीस शिपाई कीर्ती घारगे यांच्या पथकाने केली.