पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील शाळा महाविद्यालयांबाहेर फिरणाऱ्या रोडरोमियोंवर पोलिसांची धडक कारवाई; ४२ जण ताब्यात, २४ दुचाक्या जप्त

2184

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील शाळा, महाविद्यालये आणि खाजगी विद्यापीठांबाहेर उभे राहून विद्यार्थीनींची छेडछाड करणे, तसेच बाहेरील विद्यार्थ्यांना दमदाटी करुन मारहाण करुन लुटमार करण्याच्या घटना समोर समोर आल्या होत्या. याची गंभीर दखल घेत पिंपरी पोलिसांनी आज (बुधवार) सकाळी पिंपरीतील नवमहाराष्ट्र विद्यालय आणि चिंचवड मोहननगर येथील प्रभात महाविद्यालयाच्या परिसरातील रोडरोमियोंवर कारवाईचा बडगा उगारला. महाविद्यालयाचे ओळखपत्र नसलेल्या ४२ विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन परिसरात अनधिकृतरित्या उभ्या असलेल्या २४ दुचाक्या जप्त केल्या आहेत.

पिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (बुधवार) सकाळी शाळा महाविद्यालयांमध्ये अॅडमिशन नसून देखील महाविद्यालयाच्या परिसरात आणि गेटवर उभे राहून टवाळक्या करणाऱ्या रोडरोमियोंवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई पिंपरीतील नवमहाराष्ट्र विद्यालय आणि चिंचवड मोहननगर येथील प्रभात महाविद्यालयाच्या आवारात करण्यात आली. पोलिसांनी या ठिकाणाहून ४२ तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे शाळा महाविद्यालयाचे ओळखपत्र नसल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या कारवाई दरम्यान पोलिसांना तेथे २४ दुचाक्या देखील आढळून आल्या. पोलिसांनी त्या देखील जप्त केल्या आहेत. या वाहनांचे क्रमांक पिंपरी पोलिस वाहतूक पोलिसांना पाठवणार असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. तर ज्याच्याकडे ओळखपत्र नाही अशा विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना बोलावून त्यांना ताकीद देण्यात येणार आहे. तसेच इतर जणांवर मुंबई कायद्या अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने विस्तार झाल्याने शहर परिसरात महाविद्यालये, खाजगी शिक्षण संस्था आणि विद्यापीठे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिक आणि बाहेरील राज्यासह देश-विदेशातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. यामुळे येथे हॉस्टेलाईट विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे.

स्थानिक गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण आणि जहागिरदार या शिक्षणसंस्थांमध्ये राजरोसपणे फिरतात. तेथे मुलींची छेडछाड, हॉस्टेलाईट विद्यार्थ्यांना शिवीगाळ करुन त्यांची लुटमार करतात, तसेच शिक्षकांनाही दमदाटी करुन मारहाण केल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे बाहेरील विद्यार्थ्यांमध्ये पिंपरी-चिंचवड शहरात असुरक्षितता जाणवू लागली आहे. काही शिक्षण संस्थांमध्ये अॅडमिशन नसताना देखील बाहेरील टवाळखोर शिक्षण संस्थेंच्या आवारात हुल्लडबाजी करताना दिसतात. शिक्षण संस्थेने त्यावर आळा घालण्यास प्रयत्न केल्यास त्यांना देखील दमदाटी आणि मारहाण केली जाते. त्यामुळे ते बऱ्याचदा स्थानिकांच्या नादीच लागायला नको म्हणून बऱ्याच प्रकरणातून काढता पाय घेतात. काही शिक्षण संस्थेमध्ये स्थानिकांचे वर्चस्व आहे. यामुळे राजकीय हस्तक्षेप करुन प्रकरण मिटवली जातात.

अनेक विद्यार्थी अन्यायाविरोधात लढा देऊन पोलिसांकडे जातात. मात्र, मूळ स्थानिक असल्यास राजकीय हस्तक्षेप आणि पैशांच्या जोरावर प्रकरण दाबली जातात. तसेच त्या विद्यार्थ्याला टारगेट करुन मारहाण केली जाते. यामुळे शेवटी त्या विद्यार्थ्यांना शिक्षण अर्ध्यावर सोडून द्यावे लागते.

अलीकडच्या काळात शहरातील महाविद्यालयांमध्ये अभ्यासक गोष्टींवर कमी आणि राजकारण जास्त पहायला मिळते. तेथे असलेल्या विविध विद्यार्थी संघटना या वेस्टन क्लचर पासून प्रभावीत होऊन डेज या संकल्पनेखाली फेब्रुवारी महिन्यात (चॉक्लेट डे, किस डे, साडी डे आणि वेलंटाईन डे) असे दिवस साजरे करतात. यामुळे महाविद्यालयामध्ये संघटनात्मक वाद होतात. त्यातून भांडणे, गुन्हेगारी आणि व्यसनाकडे विद्यार्थी वळतात. यामुळे बरेच विद्यार्थी अर्ध्यावर शिक्षण सोडून टवाळखोर बनतात. यातूनच शिक्षण संस्थेच्या आवारात गुन्हेगारी बळावते. यामुळे अशा प्रकारच्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रोडरोमियोंवर केलेल्या कारवाईचे स्वागत केले जात आहे.