पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सात चो-या; सव्वाचार लाखांचा मुद्देमाल चोरीला

120

देहूरोड, दि. ३ (पीसीबी) – तळेगाव एमआयडीसी, निगडी, वाकड, चाकण, देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या सात घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये चोरट्यांनी चार लाख 33 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. 2) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यमुनानगर निगडी येथे घराजवळ पार्क केलेली 40 हजार रुपये किमतीची कार अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 30) सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी केशव मोहन बाबर (वय 31, रा. यश हौ. सोसायटी, यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्राधिकरण आणि ताथवडे परिसरातून दोन दुचाकी चोरीस गेल्या. दुचाकी चोरीच्या पहिल्या घटनेत राहूल अरूणराव शहाणे (वय 38, रा. वारजे, पुणे) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शहाणे यांनी त्यांची 35 हजार रुपये किमतीची दुचाकी गुरुवारी दुपारी पावणे बारा वाजताच्या सुमारास भेळ चौक, प्राधिकरण, निगडी येथे पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

वाहन चोरीची दुसरी घटना ताथवडे येथे घडली. सुनीलकुमार विश्‍वास बनसोडे (वय 28, रा. साई कॉलनी, किवळे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची 40 हजार रुपये किमतीची दुचाकी 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास ताथवडे येथील व्हिजन मॉलच्या गेटसमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली.

मावळ तालुक्यातील वराळे येथे घरफोडीचा प्रकार घडला. यात अज्ञात चोरट्यांनी कोयंडा तोडून घरात प्रवेश करत 10 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी संजय भागवत पाटील (वय 50, रा वरद विनायक सोसायटी, वराळे, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खालूंब्रे येथील थायसन ग्रुप अॅलवेटर प्रा ली या कंपनीच्या ट्रक मधून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 53 हजारांच्या 211 पीस बॅटरी स्क्रॅप चोरून नेले. हा ट्रक चिंबळी फाटा येथे उभा केला असता अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. याप्रकरणी रामफळ ओमप्रकाश शर्मा (वय 56, रा. निगडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यशवंतनगर, तळेगाव स्टेशन येथे एका घरात उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून अज्ञात चोरट्याने नऊ हजारांचा एक मोबाईल फोन, 20 हजारांचा लॅपटॉप, 1200 रुपये रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी अक्षय हिरालाल सावंत (वय 24, रा. यशवंतनगर, तळेगाव स्टेशन) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

घरासमोर पार्क केलेल्या इको गाडीचा 25 हजार रुपये किमतीचा सायलेन्सर अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी गणेश शिवाजी परंडवाल (वय 30, रा. देहूगाव, माळवाडी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.