पिंपरी–चिंचवड शहराला पूर्वमोसमी पावसाने झोडपले

121

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – उकाड्याने हैराण झालेल्या पिंपरी-चिंचवडकरांना पूर्वमोसमी पावसाने आज (रविवार) सायंकाळी सुखद गारवा दिला. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाने हजेरी लावली. तासभर पडलेल्या पावसामुळे सगळेकडे पाणीच पाणी झाले. उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. पण उकाडा कमालीचा जाणवत होता. घामाच्या धारांनी  नागरिकांना असहाय्य केले होते. दुपारी पाचनंतर आभाळात ढगांची गर्दी वाढू लागली, तसे जोरदार वारे वाहू लागले. त्यानंतर जोराच्या वादळासह पावसाने शहराला झोडपून काढले. वादळी वाऱ्यामुळे झाड्यांच्या फांद्या जोरजोरात हलकावे खात होत्या.

पावसाने शहराच्या सखल भागात पाणी साचले. तर बच्चे कंपनीने पावसात भिजत उकाड्यातून सुटका करण्याचा प्रयत्न केला. तर जोरदार पावसामुळे  पथारी, हातगाडी, फुटपाथवरील विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी दुचाकीवरील नागरिकांनी आडोसा शोधला. तर काहींनी भिजत घरी जाणे पसंत केले.