पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारपासून पुन्हा पाणीकपात 

282

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराला ८ ऑगस्टपासून दररोज पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, शहरातील सर्व भागांमधून कमी दाबाने पाणी किंवा कमी वेळ तसेच काही भागात पाणीच येत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे मुबलक आणि सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी  सोमवारपासून (दि.१९) आठवड्यातून एक दिवस शहरातील विभागनिहाय पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पत्रकाद्वारे दिली आहे.

शहराला प्रतिदिन ४८० एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो. शहराची वाढती लोकसंख्या व त्यासाठी लागणारे नळ कनेक्शन यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सध्याच्या पाणीपुरवठ्याच्या शुध्दीकरण व वितरण व्यवस्थेवर ताण येत आहे. परिणामी शहराला दररोज मुबलक आणि सुरळीत पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर विभागनिहाय आठवड्यातील एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

घरातील नळ, फ्लश, पाईपलाईन चांगल्या दर्जाचे वापरावेत, पाण्याची गळती होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. टाक्या ओव्हर फ्लो होऊ देऊ नये. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. आवश्यक तितका पाण्याचा वापर करून पाण्याचा अपव्यय टाळावा. गळती बाबत महापालिकेच्या सारथी हेल्पलाईन ८८८८००६६६६ या फोननंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.