पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी सायंकाळी बंद राहणार; शुक्रवारी सकाळी अनियमित

210

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निगडी सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरूस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे येत्या गुरूवारी (दि. ३०) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे. तसेच शुक्रवारी (दि. ३१) सकाळी अनियमित पाणीपुरवठा होणार आहे.

शहराला निगडी, सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. या जलशुद्धीकरण केंद्रात वेळोवेळी देखभाल दुरूस्तीची कामे करावी लागतात. त्यानुसार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने येत्या गुरूवारी देखभाल दुरूस्तीची कामे करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच रावेत येथील पंपिंग स्टेशनमध्ये देखील विद्युतची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे गुरूवारी सकाळी संपूर्ण शहराला नियमितपणे पाणीपुरवठा केला जाणार आहे. परंतु, सायंकाळी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. तसेच शुक्रवारी सकाळी शहराला अनियमित पाणीपुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी गुरूवारी आणि शुक्रवारी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून दोन दिवस त्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.