पिंपरी-चिंचवड शहरपरिसरातून दहा दिवसात दोन लाखांच्या पाच दुचाक्या चोरट्यांनी पळवल्या

203

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील विविध भागातून १० ऑगस्ट ते १९ ऑगस्ट या दहा दिवसांच्या कालावधीत तब्बल दोन लाख रुपये किमतीच्या पाच दुचाक्या चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले आहे. वारंवार दुचाकीचोरीच्या घटनेत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे वाहन चोरांवर लवकरात लवकरत आळा घालण्याची मागणी पिंपरीचिंचवडकरांनी केली आहे.

पोलिसांच्या आकडेवारीअनुसार, १० ऑगस्ट ते १९ ऑगस्ट या दहा दिवसांच्या कालावधीत हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ९० हजार रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची एक बुल्टे, १५ हजारांची ग्रे रंगाची एक होंडा एविएटर मोपेड, भोसरी येथून १५ हजारांची (एमएच-१४-एजी-७१०२) होंडा स्प्लेंडर, वाकड येथून ४० हजारांची (एमएच-१४जीजे-८३४१) मोपेड ऍक्सेस आणि निगडी येथून ४० हजार रुपये किमतीची (एमएच-४४-जीएम-५९२५) एक दुचाकी अशा एकून दोन लाख रुपये किमतीच्या पाच दुचाक्या चोरट्यांनी पळवल्या आहेत. या दुचाक्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

दरम्यान पिंपरी-चिंचवड शहर परिसरात वाढत चाललेली वाहन चोरी हा चिंतेचा विषय झाला आहे.  बऱ्याचशा प्रकरणात चोरतर लांबच मात्र दुचाकीदेखील वर्षांनुवर्षे सापडत नाही. यामुळे वाहनचोरीवर आळा घालण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांसमोर आहे.