पिंपरी-चिंचवड महापालिकेचे १३३ नगरसेवक केरळला एक महिन्याचे मानधन देणार

727

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पावसाने घातलेल्या थैमानामुळे उद्ध्वस्त झालेल्या केरळला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व १३३ नगरसेवकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. हे सर्व १३३ नगरसेवक आपले एक महिन्याचे मानधन केरळ पूरग्रस्तांना पुन्हा नव्याने उभे राहण्यासाठी देणार आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनीही एक दिवसाचे वेतन केरळ पूरग्रस्तांना द्यावे, असे आवाहन नगरसेवकांनी केले आहे.

सोमवारी (दि. २०) महापालिकेची सभा झाली. या सभेत माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह निधन पावलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना तसेच केरळमध्ये आलेल्या पुरात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांनी श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या केरळवासीयांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

नगरसेवक बाबू नायर यांनी पूरग्रस्त केरळसाठी सर्व नगरसेवक तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत महापालिका सभागृहातील सर्वच १३३ नगरसेवकांनी आपले एक महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक नगरसेवकाला महिन्याला १५ हजार रुपये मानधन मिळते. त्यानुसार एकूण १९ लाख ९५ हजार रुपये केरळ पूरग्रस्तांना दिले जाणार आहे.