पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच सत्ता स्थापन केलेल्या भाजपची वर्षपूर्ती होत असताना विरोधात बसण्याची वेळ आलेल्या राष्ट्रवादीतही नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने महापालिकेचे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांची उचलबांगडी करण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षनेतेपदी नगरसेवक नाना काटे यांची निवड केली जाणार असल्याचे समजते. पक्षाचे सर्वेसर्वा आमदार अजितदादा पवार यांनी काटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे बोलले जात आहे.

महापालिकेवर राष्ट्रवादीची सलग १५ वर्षे सत्ता होती. २०१७ च्या निवडणुकीत शहरातील मतदारांनी महापालिकेची सत्ता भाजपच्या हातात दिली. भाजप पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी बनले. भाजपच्या या पहिल्याच सत्तेची १५ मार्च २०१८ रोजी वर्षपूर्ती झाली. या वर्षपूर्तीनंतर भाजपमध्ये पदाधिकारी बदलाचे वारे वाहण्यास सुरूवात होतील, अशी राजकीय चिन्हे दिसत आहेत. भाजपची ही वर्षपूर्ती आणि पक्षात पदाधिकारी बदलाचे वारे वाहत असताना प्रमुख विरोधक असलेल्या राष्ट्रवादीतही नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत.

विरोधी पक्षनेते योगेश बहल यांना राजीनामा देण्यास लावून या पदावर अन्य नगरसेवकाला संधी देण्याचा निर्णय आमदार अजितदादा पवार यांनी घेतला आहे. बहल यांच्यानंतर कोणाला विरोधी पक्षनेतेपद द्यायचे यावरही प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी चर्चा केल्याचे समजते. त्यानुसार बहल यांनी राजीनामा दिल्यानंतर पिंपळेसौदागरचे नगरसेवक नाना काटे यांची विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लावण्याचा अंतिम निर्णय झाल्याचे बोलले जात आहे. नाना काटे हे राष्ट्रवादीकडून दुसऱ्यांदा नगरसेवक झाले आहेत. याशिवाय त्यांच्या पत्नीही पक्षाच्या तिकीटावर दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.

दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने हेदेखील इच्छुक आहेत. या पदासाठी त्यांनीही हट्ट धरला असल्याचे समजते. परंतु, साने यांना सभागृहात प्रभावीपणे बोलता येत नाही. कोणत्या मुद्द्यावर काय बोलावे आणि किती बोलावे याचा ताळतंत्र साने बाळगत नाहीत. सभागृहात बोलत असताना अनेकदा त्यांची जीभही घसरते. अशा वेळी सत्ताधारी भाजपकडून पक्षाला अडचणीत पकडण्याचा प्रयत्न झाल्यास साने हे कुचकामी ठरू शकतात. त्यामुळे अजितदादांनी साने यांच्याऐवजी पक्षातील सर्व गटा-तटाच्या नगरसेवकांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता असलेल्या नाना काटे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याची सूचना पक्ष पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते. त्यामुळे विरोधी पक्षनेता निवडीसाठी राष्ट्रवादीत लवकरच राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.