पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पावर मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी साडेसहा तास चर्चा केली. चर्चेनंतर सत्तधारी भाजपने अर्थसंकल्पाला सुमारे २६४ कोटींच्या तब्बल ४६६ उपसूचना दिल्या. त्यानंतर सभा तहकूब करण्यात आली. उपसूचनांची ग्राह्यता तपासून शुक्रवारी (दि. २३) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाणार आहे.

महापौर नितीन काळजे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. महापालिकेचा आगामी २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प ५ हजार २३५ कोटींचा आहे. स्थायी समितीने या रक्कमेत कोणीतीही वाढ न करता सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी सादर केला होता. त्यावर मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत साडेसहा तास चर्चा झाली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपापली मते मांडून अर्थसंकल्पाची शंभर टक्के अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

अर्थसंकल्पाबाबात आयोजित या सभेला राष्ट्रवादीसोबतच सत्ताधारी भाजपचेही अनेक नगरसेवक अनुपस्थित होते. तसेच उपस्थित सर्वपक्षीय नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर बोलण्याऐवजी आपापल्या प्रभागातील आणि गल्लीतील समस्यांवरच अधिक मते प्रदर्शित केली. त्यामुळे लोकांमधून निवडून आलेल्या या नगरसेवकांमध्ये अर्थसंकल्पाबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून आले.

अर्थसंकल्पावर साडेसहा तास चर्चा केल्यानंतर सत्ताधारी भाजपने २६४ कोटींच्या ४६६ उपसूचना दिल्या. त्यामध्ये ७४६ नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्याच्या उपसूचना आहेत. त्यातील ३८६ उपसूचना शून्य तरतूदीच्या आहेत. तरतुदींमध्ये वाढ व घट करण्याच्या ३६० उपसूचना आहेत. या उपसूचनांची प्रशासनाकडून ग्राह्यता तपासण्यात येणार आहे. त्यासाठी महापौर नितीन काळजे यांनी शुक्रवारपर्यंत सभा तहकूब केली. त्यामुळे उपसूचनांची ग्राह्यता तपासल्यानंतर त्यातील योग्य उपसूचना स्वीकारून येत्या शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाणार आहे.