पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण समिती सभापती ९ जुलै रोजी ठरणार; प्रा. गव्हाणे, बुर्डे, भोंडवे, बाबर यांची नावे चर्चेत

107

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत सव्वा वर्षानंतर अस्तित्वात आलेल्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी ९ जुलै रोजी निवडणूक होत आहे. शिक्षण मंडळ बरखास्त करून अस्तित्वात आलेल्या शिक्षण समितीचा पहिला सभापती कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. समितीमध्ये भाजपचे बहुमत आहे. त्यामुळे सभापतीपदी भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे, सुवर्णा बुर्डे, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नगरसेविका संगीता भोंडवे आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेविका शर्मिला बाबर यांच्यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. नगरसेविका सोनाली गव्हाणे या प्राध्यापिका असल्यामुळे सभापतीपदासाठी त्यांचे पारडे जड मानले जात आहे.

महापालिकेत फेब्रुवारी २०१७ मध्ये सत्तांतर झाले. राष्ट्रवादीची सलग दहा वर्षांची सत्ता खेचून भाजपने महापालिका ताब्यात घेतली. त्यानंतर महापौरांसह इतर सर्व पदाधिकारी तसेच विषय समित्या व प्रभाग समित्यांच्या सभापतीपदांची निवड झाली. भाजपचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी याच पक्षाच्या नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली. परंतु, शहरातील हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि त्यांना दिशा देण्याची जबाबदारी असलेली शिक्षण समिती सव्वा वर्षे झाले तरी अस्तित्वात आली नाही. भाजप पदाधिकाऱ्यांच्या अज्ञानामुळे शिक्षण समिती अस्तित्वात येण्यास विलंब झाला. अखेर सव्वा वर्षानंतर जून महिन्याच्या सर्वसाधारण सभेत शिक्षण समितीवर ९ नगरसेवकांची निवड करण्यात आली.

यापूर्वी महापालिकेत शिक्षण मंडळ अस्तित्वात होते. त्यामध्ये कायद्यानुसार कार्यकर्त्यांची वर्णी लावली जात होती. परंतु, राज्य सरकारने शिक्षण मंडळ बरखास्त करून नगरसेवकांचा समावेश असलेली शिक्षण समिती तयार करण्याचा कायदा केला आहे. त्यानुसार ९ नगरसेवकांचा समावेश असलेली शिक्षण समिती अस्तित्वात आली आहे. आता या समितीच्या सभापतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. विभागीय आयुक्तांनी ९ जुलै रोजी दुपारी एक वाजता ही निवडणूक घेण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे संचालक सुशील खोडवेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक घेतली जाणार आहे.

शिक्षण समितीत भाजपच्या प्रा. सोनाली गव्हाणे, सुवर्णा बुर्डे, शर्मिला बाबर, शारदा सोनवणे, संगीता भोंडवे या पाच नगरसेविका, राष्ट्रवादीच्या विनया तापकीर, उषा काळे, राजू बनसोडे हे तीन नगरसेवक आणि शिवसेनेच्या अश्विनी चिंचवडे या एकमेव नगरसेविका सदस्य आहेत. समितीत भाजपचे बहुमत असल्यामुळे याच पक्षाच्या एका समिती सदस्याला सभापतीपद मिळणार आहे. सभापतीपदासाठी भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या नगरसेविका प्रा. सोनाली गव्हाणे यांचे पारडे जड मानले जात आहे. त्या प्राध्यापिका असल्यामुळे त्यांनाच शिक्षण समितीचे सभापतीपद मिळेल, असा कयास आहे. त्याचप्रमाणे सभापतीपदासाठी भोसरी मतदारसंघातीलच सुवर्णा बुर्डे, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील संगीता भोंडवे आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातील शर्मिला बाबर यांचीही नावे चर्चेत आहेत. शिक्षण मंडळ बरखास्त करून अस्तित्वात आलेल्या शिक्षण समितीच्या पहिल्या सभापतीपदी या चार नगरसेविकांपैकी कोणाची वर्णी लागते हे ९ जुलै रोजी स्पष्ट होणार आहे.