पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात व शाळांमध्ये अटलजींचे, तर सभागृहात अब्दुल कलाम यांचे तैलचित्र लागणार

194

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयाच्या दर्शनी भागात तसेच महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये माजी पंतप्रधान दिवंगत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. महापालिकेच्या नदी सुधार प्रकल्पालाही वाजपेयी यांचे नाव दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे महापालिका सभागृहात माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे तैलचित्र लावले जाणार आहे. त्याबाबत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी (दि. २०) निर्णय घेण्यात आला.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत माजी पंतप्रधान दिवंगत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह विविध क्षेत्रातील निधन पावलेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी वाजपेयी यांच्या उत्तुंग आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाबद्दल आदर व्यक्त करून भारतीय राजकारणात असा व्यक्ती पुन्हा होणे नाही, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

भाजपच्या अनेक नगरसेवकांनी वाजपेयी यांच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड भेटीच्या व सभांमध्ये त्यांनी केलेल्या भाषणांच्या आठवणी जागवल्या. त्यांच्या अंगी असणाऱ्या सुसंस्कृत राजकारणातील एक जरी गुण आपण घेतला, तर आपले आयुष्य धन्य पावेल, अशा भावना नगरसेवकांनी व्यक्त केल्या. अनेक नगरसेवकांनी महापालिका सभागृहात अटलबिहारी वाजपेयी यांचे तैलचित्र लावण्याची मागणी केली. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयाच्या दर्शनी भागात तसेच महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये माजी पंतप्रधान दिवंगत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. महापालिकेच्या नदी सुधार प्रकल्पालाही वाजपेयी यांचे नाव दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे महापालिका सभागृहात माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे तैलचित्र लावले जाणार आहे. त्याबाबत सभागृहात निर्णय घेण्यात आला.

भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका माई ढोरे, स्थायी समिती माजी अध्यक्षा सीमा सावळे, आशा धायगुडे-शेंडगे, सुजाता पालांडे, स्वीनल म्हेत्रे, माया बारणे, अश्विनी जाधव, अश्विनी बोबडे, बाबू नायर, नामदेव ढाके, बाळासाहेब ओव्हाळ, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, अश्विनी चिंचवडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, वैशाली काळभोर यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी माजी पंतप्रधान दिवंगत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना सभागृहात श्रद्धांजली वाहिली.