पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांचा पगार रखडला; पोलीस हवालदिल

104

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – मोठ्या अडचणींमधून सुरु झालेले पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या समस्या काय केल्या संपन्याचे नाव घेत नाहीएत. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील पोलिस कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांपासून पगार रखडल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना अर्थीक चनचन भासू लागली आहे.  

प्रशासकीय अडचणींसोबत आता कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या देखील अडचणी समोर येत आहेत. आयुक्तालयाला सुरुवातीपासूनच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. सुरुवातीला कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने आयुक्तालयाच्या कारभाराला गती मिळाली नाही. त्यानंतर आयुक्तालयाला वाहनांच्या समस्या होत्या. यासाठी अतिवरिष्ठ पातळीवरून देखील आयुक्तालयाला म्हणावे तेवढे सहकार्य मिळाले नाही. आता कार्यालयीन कर्मचाऱ्यांमुळे पोलिसांचे पगार वेळेवर होत नाही. यामुळे पोलीस कर्मचारी हवालदिल झाले आहेत. सध्या काही पोलिसांच्या घरात लग्न देखील आहेत. पगार न झाल्याने तसेच पॉलिस्यांमधील रक्कम न मिळाल्याने त्यांना नाईलाजाने बाहेरुन कर्ज काढण्याची वेळ आली आहे.

तर, पुणे पोलिस आयुक्तालयातून वेगळ्या झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे डिटॅच-अटॅच होण्यासाठी विलंब झाल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनाची अडचण होती. नऊ पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे पगार रखडले होते. सोमवारी त्या सर्व पोलिस ठाण्याचे पगार झाले आहे. अपवादात्मक स्थितीत काही कर्मचाऱ्यांचे वेतन राहिले आहे. त्याबाबत प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. कर्मचाऱ्यांचा पाचवा आणि सहावा वेतन आयोगाचा फरक देखील आताच्या वेतनासोबत कॅरी फॉरवर्ड केला आहे. अपवादात्मक स्थितीत राहिलेल्या कर्मचाऱ्यांचेही वेतन आज होईल, अशी माहिती श्रीधर जाधव, सहाय्यक पोलिस आयुक्त (प्रशासन) यांनी दिली आहे.