पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे कामकाज १५ ऑगस्टपासून; ऑटो क्लस्टरमध्ये आयुक्तालयासाठी पर्यायी व्यवस्था

199

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरासाठी निर्माण करण्यात आलेल्या स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचे कामकाज येत्या १५ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. चिंचवड येथील प्रेमलोक पार्कमध्ये पोलिस आयुक्तालयासाठी सुसज्ज कार्यालय सुरू होईपर्यंत चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या कार्यालयातून कामकाज चालणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रेमलोक पार्कमध्ये पोलिस आयुक्तालयाचे कार्यालय सुसज्ज झाल्यानंतर त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालय सुरू करण्यासंदर्भात पालकमंत्री बापट यांनी औंध येथील पीएमआरडीए कार्यालयात शुक्रवारी (दि. ३) बैठक घेतली. भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अतिरिक्त पोलिस आयुक्त मकरंद रानडे, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे आदी बैठकील उपस्थित होते.

या बैठकीबाबत सत्तारूढ़ पक्षनेते एकनाथ पवार माहिती देताना म्हणाले, “पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय मंजूर झाले आहे. आयुक्तालयांतर्गत एकूण १५ पोलिस ठाणे आणि २ हजार २०० पोलिस कर्मचारी असणार आहेत. पोलिस आयुक्तालयाचे कामकाज येत्या १५ ऑगस्टपासून सुरू केले जाणार असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी बैठकीत स्पष्ट केले. चिंचवड येथील प्रेमलोक पार्कमध्ये पोलिस आयुक्तालयाचे कार्यालय असणार आहे. हे कार्यालय सुसज्ज करण्याचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. हे काम १५ ऑगस्टपूर्वी होणे शक्य नाही. त्यामुळे आयुक्तालयाचे कार्यालय सुसज्ज होईपर्यंत पर्यायी जागेतून कामकाजाला सुरूवात करण्यात येईल.

त्यानुसार चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये पोलिस आयुक्त आणि अन्य अधिकाऱ्यांसाठी तात्पुरत्या स्वरुपात व्यवस्था करण्यात येईल. येथूनच शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामकाजाला सुरूवात होईल. प्रेमलोक पार्कमधील पोलिस आयुक्तालयाच्या कार्यालयाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे त्यांनी सांगितले.”