पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सदाशिव खाडे यांची निवड

621

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराची एक महत्त्वाची नियोजन संस्था असलेल्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल १४ वर्षांनंतर प्राधिकरणाला प्रशासकीय अधिकाऱ्यांव्यतिरिक्त अध्यक्ष मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खाडे यांची प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड केल्याचा आदेश शुक्रवारी (दि. ३१) जारी केला आहे.

शहराच्या सुनियोजित विकासासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची १९७२ मध्ये स्थापना झाली. निगडी, थेरगाव, रहाटणी, रावेत, वाल्हेकरवाडी, चिखली, मोशी या भागातील जमिनींचे संपादन करून प्राधिकरणाच्या ताब्यात देण्यात आली. या जमिनींवर सामान्यांना परवडतील, अशी घरे बांधून देण्याचा प्राधिकरणाचा मुख्य उद्देश होता. परंतु, गेल्या काही वर्षांपासून प्राधिकरण या उद्देशांपासून भरकटले असल्याचे दिसून येत आहे.

प्राधिकरण ही स्वतंत्र संस्था असल्यामुळे त्याच्या अध्यक्षाची राज्य सरकारकडून नियुक्ती केली जाते. १९७२ पासून आतापर्यंत सर्वाधिक काळ राज्य सरकारच्या सेवेतील सनदी अधिकाऱ्यांनाच प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. १९९५ मध्ये राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतर शिवसेनेच्या अगस्ती कानिटकर यांची प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. २००१ मध्ये काँग्रेसच्या बाबासाहेब तापकीर यांची प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड झाली. ते २००४ पर्यंत या पदावर होते. तेव्हापासून ते आजतागायत प्राधिकरणाचे अध्यक्षपद सनदी अधिकाऱ्यांकडेच होते.

आता राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपने प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी आपल्या कार्यकर्त्याला संधी दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांची प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांनी शुक्रवारी (दि. ३१) १० महामंडळे, ६ मंडळे, २ प्राधिकरण आणि एक आयोगाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड केल्याचे आदेश जारी केले आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सदाशिव खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.