पिंपरी-चिंचवडमध्ये होम क्वारंटाइनचे पालन न करणाऱ्या १३ जणांना बजावली नोटीस

205

 

पिंपरी, दि.२५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमध्ये होम क्वारंटाईनचे पालन न करणाऱ्या १३ जणांना बजावण्यात आली आहे. सध्या शहरात १ हजार १६० जण होम क्वारंटाइनमध्ये असून त्यांना १४ दिवस आणि गरज भासल्यास २८ दिवस घरातच थांबण्याची सूचना महानगर पालिकेने दिल्या आहेत. सूचनांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर सूचनांचे पालन न करणाऱ्या १३ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात करोनाने थैमान घातले असून आत्तापर्यंत १२ जणांना याची बाधा झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरात एकही रुग्ण आढळला नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र, शहरात १ हजार १६० व्यक्ती या होम क्वारंटाइनमध्ये असून त्यांच्यावर महानगर पालिकेच्या विशेष पथकाचे लक्ष आहे.

सुचनांचे पालन न केल्यास संबंधित व्यक्तीला पोलिसांमार्फत ताब्यात घेऊन १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये ठेवणार असल्याचे यावेळी महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या आदेशाचे पालन न झाल्यास कायदेशीर तरतूद असून सहा महिन्यांचा कारावास होऊ शकतो अशी माहिती महापौर उषा उर्फ़ माई ढोरे आणि पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि नवीन भोसरी रुग्णालय येथील एकूण १३७ जणांचे घशातील द्रव्याचे नमुने पुण्यातील एनआयव्ही येथे तपासण्यासाठी पाठवण्यात आले होते. यापैकी, ११२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात आढळलेल्या १२ करोना बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परदेश प्रवास करून चीन, दक्षिण कोरिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इराण, दुबई, सौदी अरेबिया, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कतार, ओमान, कुवेत आणि आखाती देशांमधुन आलेल्या सर्व नागरिकांनी किमान १४ दिवस स्वत:हुन घरामध्ये (Home Quarantine) वेगळे राहावे. जे नागरिक घरामध्ये (Home Quarantine) राहणार नाहीत अशा नागरिकांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात येऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

WhatsAppShare