पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतुकीच्या विरुध्द दिशेने वाहन चालवल्यास आता सहा महिने कैद

3671

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन विरुद्ध दिशेने वाहन चालवत अपघाताला आमंत्रण देणाऱ्या, तसेच स्वत:सह दुसऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी  पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. आयुक्तांनी आज (बुधवार) याबाबत संबंधीत पोलिसांना आदेश दिले आहेत.

या आदेशामध्ये वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन वाहतुकीच्या विरुध्द दिशेने वाहन चालवून स्वत:सह दुसऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या वाहन चालकांवर भारतीय दंड संहिता कलम २७९ प्रमाणे गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यास सांगितले आहे. कलम २७९ अनुसार  नियम मोडणाऱ्या वाहनचालकाला सहा महिने कैद आणि एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.  त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त पद्मनाभन यांनी केले आहे.