पिंपरी-चिंचवडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी; झाड कोसळून एकजण जखमी

267

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – बऱ्याच दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दसऱ्याच्या मुहूर्तावर पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे दीड तास वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली आहे. गुरूवारी (दि. १८) सायंकाळच्या सुमारास झालेल्या या पावसामुळे शहरातील ठिक-ठिकाणी झाडे कोसळली. झाड कोसळल्यामुळे चिंचवडमधील एक नागरिक जखमी झाला.

मोहन फडके (रा. चंद्रभागा कॉलनी, चिंचवड) असे जखमी झालेल्या नागरिकाचे नाव आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाऊसाने दडी मारली होती. काल (गुरुवारी) दसरा असल्याने सर्वच नागरिक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. परंतु, सायंकाळच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला. अगोदर हलक्या सरी कोसळल्यानंतर अचानकच विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. कोसळणारा पाऊस पाहून या सणाचा आनंद द्विगुणित झाला आहे. शहराच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला आहे.

मात्र, काल (गुरुवारी) झालेल्या पावसामुळे शहरातील ठिक-ठिकाणी झाडे कोसळली. चिंचवड गावातील चंद्रभागा कॉलनीतील नंदकुमार मिसार आणि लता बारणे यांच्या घरावर झाड कोसळले. या घटनेत मोहन फडके हा नागरिक जखमी झाला आहे. झाड घरावर पडल्याने झाडाच्या फांद्या घराच्या छतातून आत घूसल्या होत्या. त्यामुळे घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच मोरवाडी येथे रस्त्यावर झाड कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

दरम्यान, चिंचवड येथील श्रीराम गावडे यांनी चंद्रभागा कॉलनीतील धोकादायकरित्या झाडे व झुकलेल्या फांद्यांची कटाई करण्यात यावी, या संदर्भात  ‘ब’ प्रभागाच्या उद्यान व वक्षसंवर्धन विभागाकडे मागणी केली होती. मात्र, वृक्षतोड विभागाने याची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे, काल (गुरुवारी) झालेल्या पावसामध्ये झाड कोसळून एक नागरिक जखमी झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवीत हानी झालेली नाही.