पिंपरी-चिंचवडमध्ये मांगल्यपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाचे आगमन

158

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमध्ये लाडक्या गणरायाचे ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत आगमन झाले. ‘गणपत्ती बाप्पा मोरया’… गणेश गणेश… ‘मोरया रे बाप्पा, मोरया रे’ अशा जयघोषात मांगल्यपूर्ण वातावरणात  आज ( गुरुवारी) घरोघरी आणि शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची विधीवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. आज सकाळपासून गणेशमूर्ती घरी आणण्यासाठी लोकांची लगबग दिसून आली.

बाप्पांना घरी नेण्यासाठी  दुपारी १ वाजेपर्यंत चित्रशाळांबाहेर गर्दी  होती. बच्चेकंपनीही नटून-थटून लाडक्या बाप्पाला आणण्यासाठी आतुर असल्याचे दिसून आले. ‘गणपती बाप्पा मोरया’ची बँड डोक्याला बांधून लहान मुले आपल्या पालकाबरोबर आली होती. मोठ्या उत्साहात, जल्लोषात गणेश भक्तांकडून श्रींची मूर्ती घरी नेली जात होती.  गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी घराघरात धांदल  सुरू होती.

सार्वजनिक मंडळांनी झांजा-ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीने गणेशमूर्ती नेल्या.  आरास सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी  बाजारपेठामध्येही मोठी गर्दी दिसून आली. तर  मिठाईच्या दुकानांमध्ये  रांगा लागल्या होत्या. खव्याचे मोदक, उकडीचे मोदक खरेदी करण्यास लोकांकडून पसंती मिळत होती. गणरायाच्या पूजेसाठी, तसेच सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी लोकांनी केली. आज गणेशाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर बाप्पांची दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस ते अनंत चतुर्दशीपर्यंत पारंपरिक पध्दतीने गणेशभक्तांकडून मनोभावे पूजा केली जाणार आहे.