पिंपरी-चिंचवडमध्ये भरलाय विरोधकांचा वेड्यांचा बाजार; सत्ताधारी भाजपविरोधात “लांडगा आला रे आला”चे धोरण

97

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून विरोधक म्हणजे वेड्यांचा बाजार असेच चित्र तयार झाले आहे. एकाही मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यात कोणत्याच विरोधकाला यश येताना दिसत नाही. विरोधकांचे “लांडगा आला रे आला” कथेसारखे वागणे सुरू आहे. विरोधकांकडून विनाआरोप होणाऱ्या हास्यास्पद आरोपांमुळे सत्ताधारी आणि शहरातील नागरिकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. विरोधकांच्या बालिश आरोपांमुळे प्रशासनातही आनंदी आनंद आहे. स्मार्ट सिटी सादरीकरणाच्या बैठकीत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या अज्ञानावर बोट ठेवले. हे विरोधकांनी सकारात्मकेतेने घेत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अभ्यासपूर्ण मांडणीऐवजी “लांडगा आला रे आला”चे सध्याचे धोरण कायम राहिले, तर शहरातील मतदार आगामी निवडणुकांमध्ये विरोधकांकडे दुर्लक्ष केल्याशिवाय राहणार नाहीत.