पिंपरी-चिंचवडमध्ये भरलाय विरोधकांचा वेड्यांचा बाजार; सत्ताधारी भाजपविरोधात “लांडगा आला रे आला”चे धोरण

4049

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून विरोधक म्हणजे वेड्यांचा बाजार असेच चित्र तयार झाले आहे. एकाही मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यात कोणत्याच विरोधकाला यश येताना दिसत नाही. विरोधकांचे “लांडगा आला रे आला” कथेसारखे वागणे सुरू आहे. विरोधकांकडून विनापुरावा होणाऱ्या हास्यास्पद आरोपांमुळे सत्ताधारी आणि शहरातील नागरिकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. विरोधकांच्या बालिश आरोपांमुळे प्रशासनातही आनंदी आनंद आहे. स्मार्ट सिटी सादरीकरणाच्या बैठकीत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या अज्ञानावर बोट ठेवले. हे विरोधकांनी सकारात्मकेतेने घेत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. अभ्यासपूर्ण मांडणीऐवजी “लांडगा आला रे आला”चे सध्याचे धोरण कायम राहिले, तर शहरातील मतदार आगामी निवडणुकांमध्ये विरोधकांकडे दुर्लक्ष केल्याशिवाय राहणार नाहीत.

२०१७ मध्ये महापालिकेत भाजपची सत्ता आल्यामुळे राष्ट्रवादीचे शहरातील राजकीय वर्चस्व संपुष्टात आले. सत्ता येण्यापूर्वी भाजपने महापालिकेतील भ्रष्टाचारावर हल्लाबोल करत राष्ट्रवादीच्या नाकीनऊ आणले होते. प्रत्येक आरोपांत पुरावे पुढे येत असल्यामुळे राष्ट्रवादीची प्रचंड राजकीय नाचक्की झाली. पुराव्यांसह होणाऱ्या आरोपांना राष्ट्रवादीने गांभीर्याने घेतले नाही आणि महापालिकेतील सत्ता गमवावी लागली. सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादीकडून भाजपचाच कित्ता गिरवण्याचा प्रयत्न होत आहे. ऊठसूठ प्रत्येक गोष्टींना विरोध करणे आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणे हा राष्ट्रवादीचा धंदाच बनला आहे. परंतु, आरोप करताना पुरावे मात्र पुढे केले जात नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीला कोणी गांभीर्याने घेताना दिसत नाही.

ऊठसूठ आरोप करण्याचा मारूती भापकर नावाच्या एका भंपकाने उद्योग आरंभला आणि राष्ट्रवादीकडून आरोपांचे नाटक छान रंगवले जात आहे. मारूती भापकर हा बाहेर समाजसेवक, तर आतून शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून वावरतो. त्याच्या या दुतोंडीपणाचा कळस म्हणजे सत्ताधारी भाजपवर आरोपांचे प्रसिद्धीपत्रक काढण्यासाठी स्वतःचे दोन रुपये सुद्धा तो खर्च करत नाही. प्रसिद्धीपत्रकांसाठी महापालिकेचेच कागद वापरतो आणि महापालिकेतच प्रिंट काढतो. सर्व काही फुकटात मिळत असल्यामुळे त्याला एखाद्या विषयांवर अभ्यासपूर्ण आरोप करण्याची गरज वाटत नाही. कुणी निंदा अथवा वंदा सत्ताधाऱ्यांविरोधात महापालिकेच्याच खर्चाने दररोज प्रसिद्धीपत्रके काढणे हाच भंपक भापकराचा धंदा झाला आहे. तथ्यहिन आरोप करून प्रसिद्धी कशी मिळवायची याचे धडे भापकरांकडून शिकून घ्यावे, असे महापालिकेच्या राजकीय वर्तुळात गंमतीने पण गंभीरतेने म्हटले जाते.

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचेही मारूती भापकरच्या वाटेने राजकीय प्रवास सुरू आहे. दत्ता साने यांनी विरोधी पक्षनेते झाल्यापासून सत्ताधारी भाजपवर आरोपांची अक्षरशः मालिका सुरू केली आहे. परंतु, विनापुरावा केल्या जाणाऱ्या या आरोपांमुळे विरोधी पक्षनेतेपदाचे गांभीर्य कमी होऊ लागले आहे. परिणामी शहराच्या राजकीय वर्तुळात दत्ता साने यांचेही महत्त्व कमी होत आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्मार्ट सिटीच्या बैठकीत दत्ता साने यांना अज्ञानाची आठवण करून देणे हे त्यांचे महत्त्व कमी झाल्याचे द्योतक मानले आहे. कचऱ्यांपासून वीजनिर्मिती आणि सौरऊर्जा तयार करणे हे दोन वेगवेगळे विषय असतानाही त्यावरून दत्ता साने यांनी बैठकीत वाद घालणे अनाकलनीय आहे. कचरा गोळा करून ते मोशीतील डेपोमध्ये नेणे, त्यावर प्रक्रिया करणे, त्यासाठी यंत्रणा उभारणे आणि प्रक्रियेनंतर वीज तयार होणे तसेच सौरऊर्जा म्हणजे सर्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी यंत्रणा उभी करणे या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत.

दत्ता साने यांनी या दोन वेगवेगळ्या बाबी एकच गृहित धरून कचऱ्यांपासून वीजनिर्मिती प्रकल्पाला विरोध करणे म्हणजे स्वतःचे अज्ञान प्रकट करण्यासारखेच आहे. हे अज्ञान दूर करण्यासाठी आयुक्त हर्डीकर यांनी सूचना करणे त्यात काहीच गैर नाही. परंतु, ही बाब समजून न घेताच आयुक्तांनाच दोष देणे म्हणजे दत्ता साने यांचा मारूती भापकर झाल्याचे स्पष्ट होते. शहराचे नेतृत्व करणारे दोन्ही खासदारही दत्ता साने आणि मारूती भापकर यांच्यापेक्षा वेगळे नाहीत. खासदार श्रीरंग बारणे आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील स्वस्तात प्रसिद्धी मिळते म्हणून विनापुरावे आरोप करून प्रसिद्धीझोतात राहण्याचा आटापिटा करताना दिसत आहेत. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे आरोपांबाबत थोडे गंभीर असले, तरी तेही आरोप करताना राष्ट्रवादीसोबत भरकटत असल्याचेच चित्र आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये विरोधकांच्या वेड्यांचा बाजार भरलाय, असेच उपहासाने म्हणण्याची वेळ आली आहे. “लांडगा आला रे आला”चे विरोधकांचे धोरण असेच कायम राहिले, तर शहरातील मतदार आगामी निवडणुकांमध्ये विरोधकांची कथेसारखी अवस्था करतील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.