पिंपरी- चिंचवडमध्ये पावसाची दमदार हजेरी

430

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – पिंपरी- चिंचवड शहरासह परिसरात पावसाने आज (मंगळवारी) दुपारी दमदार हजेरी लावली. रविवारी सकाळी आणि संध्याकाळी हलकसा पाऊस झाला होता. त्यानंतर दोन दिवस आभाळ ढगांनी भरून येत होते. दरम्यान, आज पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना चांगलाच दिलासा मिळाला. 

आज दुपारी ३ च्या सुमारास आलेल्या पावसाची सुमारे अर्धा पाऊण तास संततधार सुरू होती. पावसामुळे रस्त्यावर पाणीपाणीच झाले. अचानक आलेल्या पावसाने वाहनधारकांची त्रेधातिरपीट उडाली. दुचाकीस्वारांनी रस्त्याच्या बाजूला आडोशा शोधला. तर काही दुचाकीस्वारांनी पावसात भिजत जाणे पसंत केले. रस्त्यावरील फेरीवाले यांची पावसाने   धांदल उडविली. काही रस्ते निसरडे झाल्याने वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागली.

शहरासह ग्रामीण परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतींच्या कामाला वेग येणार आहे. मावळात भाताचे तरवे टाकण्यात शेतकरी मग्न आहे. मान्सूनचे आगमन होऊनही पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत होता. दरम्यान आज पावसाने चांगली सुरूवात केल्याने खरिपांच्या पेरणीला वेग येणार आहे. पावसामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.