पिंपरी-चिंचवडमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी

184

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमध्ये विविध ठिकाणी नागाच्या प्रतिकृतीची पूजा करून नागपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. श्रावण महिन्यातील नागपंचमी हा पहिलाच सण. त्यामुळे महिला वर्गात मोठा उत्साह दिसून येत होता. शंकर आणि नागाचे पूजन करून पुरणाचे दिंड करण्याची प्रथा आहे. महिलांनी घरातच नागाच्या प्रतिमेचे तर काहींनी एकत्र येत सामूहिकरित्या नागपंचमी साजरी केली. 

या सणानिमित्त घरोघरी पुरणाचे दिंड करून देवाला नैवेद्य दाखविण्यात आला. तर नागाच्या प्रतिकृतीला लाह्या आणि दुधाचा नैवेद्य दाखवण्यात आला. सकाळपासून श्रावणसरींचा खेळ सुरू होता. महिलांनी नटून थटून पारंपरिक उत्साहात नागपंचमीचा सण साजरा केला. सकाळपासून शहरातील नाग मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. शहरातील विविध उपनगरांत महिलांनी फुगड्यांचा फेर धरला. काही ठिकाणी झोपाळ्याचा आनंद लुटत नागपंचमीचा आनंद द्विगुणित केला. नागपंचमीच्या निमित्ताने शहरातील मंदिरांसमोर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.