पिंपरी-चिंचवडमध्ये दीड दिवसाच्या गणरायाला भावपुर्ण निरोप

164

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – गणपती बाप्पा मोरया या.. पुढच्या वर्षी लवकर या जयघोषांसह राज्यभरासह पिंपरी-चिंचवड शहरातील ठिकठिकाणी दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. गुरुवारी (दि. १३) मोठ्या आनंदाने व उत्साहात गणरायाचे घरोघरी आगमन झाले होते. मात्र, अनेकांच्या घरी परंपरेनुसार दीड दिवसातच बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. दुपारी तीन नंतर सहकुटुंब विसर्जनाला सुरुवात झाली. यावेळी कुटुंबियांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.

गणरायांची काल (गुरुवारी) म्हणजे चतुर्थीच्या मुहूर्तावर स्थापना करण्यात आली होती. काल रात्री व आज दुपारपर्यंत असा दीड दिवस पकडला जातो. त्यानुसार आज (शुक्रवारी) दुपारी तीननंतर अनेकांनी विसर्जनाची तयारी केली. त्यानंतर विधिवत पूजा, आरती करून व नैवेद्य दाखवून तलावावर व नदीच्या ठिकाणी विसर्जनास सुरुवात केली. पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच पुणे, मुंबई, कोकणात दीड दिवसाचा गणपती मोठ्या प्रमाणात असतो. या गणपतीचे सायंकाळच्या सुमारास विसर्जन करण्यात आले.