पिंपरी-चिंचवडमध्ये तुकोबा आणि माऊलींच्या पालखीचे स्वागत आणि भावपूर्ण निरोप

73

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – आकुर्डी आणि आळंदीतून पुण्याकडे निघालेल्या तुकोबा आणि ज्ञानेश्व माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पिंपरी-चिंचवडकरांनी शनिवारी (दि. ७) ठिकठिकाणी जोरदार स्वागत केले. तसेच भावपूर्ण निरोपही दिला. शहरातील विविध राजकीय, सामाजिक, धार्मिक संस्था आणि संघटनांच्या वतीने वारकऱ्यांसाठी अनेक उपक्रमांचे आयोजन व वस्तूंचे वाटप करण्यात आले. भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी फुगेवाडी येथे तुकोबांच्या पालखीचे काही काळ सारथ्य केले. स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे व भाजपच्या नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे यांच्या वतीने फुगेवाडी येथे वारकऱ्यांना खाद्यपदार्थ व विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले.

आळंदीत मुक्काम केल्यानंतर पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे शनिवारी साकळी दिघी येथील मॅगझिन चौकात स्वागत करण्यात आले. पालखीच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वागत कक्ष उभारला होता. महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर व नगरसेवकांच्या हस्ते दिंडीप्रमुखांना ताडपत्रीचे वाटप करण्यात आले. पालखीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. महापालिका आणि भाविकांच्या स्वागतानंतर माऊलींच्या पालखीने पुढे पुण्याकडे प्रस्थान ठेवले.

संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा शुक्रवारी रात्री आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्काम होता. शनिवारी पहाटे पाच वाजता मंदिरात पूजा व आरती झाली. त्यानंतर तुकोबांच्या पालखीने पुण्याकडे प्रस्थान ठेवले. पालखीच्या प्रस्थानामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर निगडी ते दापोडीपर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. महामार्गावर विविध संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कामगार संघटनांनी तुकोबांच्या पालखीचे जोरदार स्वागत केले.

भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी कासारवाडी येथे तुकोबांच्या पालखीचे काही काळ सारथ्य केले. स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे व भाजपच्या नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे यांनी वारकऱ्यांना चिक्की, लाडू व इतर खाद्य पदार्थांसह वस्तूंचे वाटप केले. एच. ए. कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ कंपनीच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. दुपारी साडेबाराच्या सुमारास दापोडी येथे तुकोबांच्या पालखीला निरोप देण्यात आला. त्यानंतर जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.