पिंपरी-चिंचवडमध्ये गुढीपाडव्यानिमित्त आकर्षक शोभायात्रा; खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या

80

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा मराठी वर्षातील पहिला सण. पिंपरी -चिंचवडमध्ये गुढी उभारून  नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशा या दिनाचे औचित्य साधून शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरांमध्ये सकाळपासूनच आकर्षक शोभायात्रा काढण्यात आल्या.   पारंपरिक कपडे परिधान करून आबालवृध्दांनी नववर्षाचे स्वागत केले. दारोदारी रांगोळ्या रेखाटून समृद्धी व विजयाचे प्रतीक असणाऱ्या गुढ्या उभारण्यात आल्या. एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत लोकांनी आपला आनंद द्विगुणीत केला.  

ढोल-ताशांच्या गजरात.. ध्वज फडकावत… सामाजिक संदेश देत शहरातील अनेक ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या. या शोभायात्रात महिलासह मुलांचा सहभाग लक्षणीय होता. पारंपरिक पेहरावातील नागरिकांमुळे वातावरणात एकप्रकारचे चैतन्य पसरले होते. हनुमान, राम, लक्ष्मण, यांच्या वेशातील लहान मुलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रांगोळ्यांची कलाकुसर, दुचाकी आणि सायकलींवर स्वार होऊन महिला व पुरुषांनी शोभायात्रेत आणखीच भर घातली.   ढोलपथकांची गर्जना, ध्वजपथकांची आकर्षक सादरीकरणे, तलवारबाजी, दांडपट्टा याची  प्रात्यक्षिके, निरनिराळ्या विषयांवरचे चित्ररथ आणि चलचित्र, सामाजिक संदेशांची देवाणघेवाण आणि पारंपरिकतेचा मोहोर असे शोभायात्रांचे स्वरूप दिसत आहे.

गुढी पाढवा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक. हा मुहूर्त साधण्यासाठी पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडीतील बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. बाजारपेठेत गर्दी वाढल्याने व्यापारी वर्गातही उत्साह दिसून येत आहे. टीव्ही, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स दुकाने नागरिकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. दुचाकी, चारचाकी गाड्यांचे अगोदरच बुकींग करण्यात आले असून आजच्या मुहूर्तावर गाड्या घरी नेण्याकडे नागरिकांनी प्राधान्य दिले. नवीन घरांची खरेदी केलेल्यांनी आज गृहप्रवेश करून हक्काचे घराच्या स्वप्नपूर्तीचा आनंद घेतला. झेंडूच्या फुलांची बाजारपेठेत मोठी आवक झाली आहे. फुले, कडूनिंबाची डहाळे खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. त्याचबरोबर तोरणे, श्रीखंड गोडधोड पदार्थांची खरेदीही जोरात दिसून येत आहे.