पिंपरी-चिंचवडमध्ये खंडेनवमी उत्साहात साजरी

242

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – औद्योगिकनगरी असा लौकिक असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात आज (सोमवार) खंडेनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहर परिसरात लहान मोठ्या कंपनीमध्ये साफसफाई करुन यंत्रसामुग्रीचे पारंपरिक पध्दतीने पूजन करण्यात आले. झेंडूची फुले, आंब्याच्या डहाळ्यांनी सजलेली प्रवेशव्दारे, गालिचा रांगोळींचा सडा, यंत्र पूजनाची लगबग असे भारावलेले वातावरण दिवसभर दिसून आले.

खंडेनवमीच्या दिवशी शस्त्रांचे पूजन करण्यात येते. यंत्रसामग्रीचे पूजन करण्यात सर्व कंपनीतील कर्मचारी व अधिकारी यांच्यात लगबग सुरू होती. तसेच काही कंपन्यांमध्ये  सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कारखान्याच्या प्रवेशव्दारांवर तोरणे लावण्यात आली होती. रांगोळ्याही काढण्यात आल्या होत्या.  फुलांची आरास करुन यंत्रसामग्री तसेच परिसर सजविण्यात आला होता. यंत्रसामग्रीचे पारंपरिक पध्दतीने पूजा केल्यानंतर मिठाईचे वाटप करण्यात आले.

दसऱ्याच्या मुहूर्तावर कामगारांना बोनस जाहीर केला जातो. त्यामुळे कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. व्यवस्थापन व कामगार, संघटना यांनी एकमेकांना शुभेच्छा देत खंडेनवमीचा आनंद व्दिगुणित केला. तर फटाक्यांच्या आतषबाजीने खंडेनवमी उत्साहात साजरी करण्यात आली.

 

WhatsAppShare