‘पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या शहर सरचिटणीसाचा कुत्र्यांच्या नसबंदीच्या निविदेत घोटाळा’

206

– पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची घोटाळ्यांची मालिका

पिंपरी, दि.१९ (पीसीबी) : कोरोनामुळे लॉकडाऊन काळात पशुवैद्यकीय विभागाने सुमारे ७ हजार १२१ श्वानांचे निर्बीजीकरण केले आहे. चार ठेकेदार संस्थांना तब्बल ७३ लाख दिले आहेत. निर्बीजीकरण श्वानाचे छायाचित्र पुरावा म्हणून जोडणे आवश्यक असताना बोगस बिलाच्या आधारावर संस्थाना बिले दिली गेली आहेत. या प्रश्नावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपावर सडकून टीका केली. भ्रष्टाचारात सत्ताधारी भाजप पदाधिकारी सहभागी असल्याचा गंभीर आरोपही सर्वसाधारण सभेत करण्यात आला असून पिंपरी–चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि.१९) तहकूब झाली. दरम्यान या सभेच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड महापौर माई उर्फ उषा ढोरे होत्या.

विषयपत्रिकेवर शहरातील भटक्या प्राण्यांसाठी महापालिका आणि पीपल फॉर अॅनिमल संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्राणी शुश्रूषा केंद्र आणि औषधोपचार केंद्र सुरू करण्याचा विषय होता. माजी महापौर योगेश बहल म्हणाले कि, कोरोना काळात सत्ताधारी भाजपने भ्रष्टाचार केला. श्वानांच्या निर्बीजीकरणातही पैसे खाल्ले. महापालिकेने कोरोना काळात सर्व बंद असतानासुद्धा साडेसात हजार श्वानांचे निर्बीजीकरण केल्याचे सांगितले. निर्बीजीकरणाचे काम चार संस्थांना दिले आहे. त्यात जीवरक्षक अॅनिमल वेल्फेअर ट्रस्ट यांनी तीन महिन्यासाठी १४७५२ श्वानांचे निर्बीजीकरण केल्याचे दाखविले. त्यासाठी त्यांना १४ लाख रुपये देण्यात आले. सोसायटी फॉर ऑफ क्युलिटी या संस्थेने १९०२ श्वानांचे निर्बीजीकरण केल्याचे दाखविले. त्यासाठी त्यांना १९ लाख रुपये दिले तर अनिमल वेल्फेअर अजिंक संस्थेने ९ हजार ९०३ श्वानांचे निर्बीजीकरण केल्याचे दाखविले. त्यासाठी त्यांना १९ लाख रुपये आणि जॉनीस ट्रस्ट या संस्थेने १ हजार ८४५ श्वानांचे निर्बीजीकरण केल्याचे दाखविले. त्यासाठी त्यांना सुद्धा १८ लाख रुपये दिल्याचे माहिती अधिकारातून कळले.

सध्या भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. तर पाळीव कुत्र्यांचा त्रास नागरिकांना होत आहे. नागरिकांना पाळीव कुत्र्यांसाठी लायसन अनिवार्य करायला हवे. तसेच शहरात कुत्र्यांसाठी स्वच्छतगृहे निर्माण करायला हवीत. तर याच कालखंडात पॉस्को या संस्थेने तेथील बायोमेडिकल कचरा उचलला नाही. त्यामुळे या काळात श्वानांचे निबीर्जीकरण झाले नसल्याचे स्पष्ट होते. इतक्या क्षमतेने शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्थाही उपलब्ध नाही. श्वानांची व्यवस्थित हाताळणी केली जात नाही. लॉकडाऊन काळात सर्व बंद असताना शस्त्रक्रिया कशा केल्या. हा संशोधनाचा विषय आहे. यामध्ये ७३ लाखाचा भ्रष्टाचार झाला असून भाजपचा एक सरचिटणीस या संस्थांशी संबंधित आहे.

दरम्यान, पुढे नगरसेविका आशा शेंडगे म्हणाल्या कि, ‘भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला असून श्वानांचे निर्बीजीकरण झाले का हे पाहण्यासाठी गेले असता. मला दीड तास आतमध्ये जाऊ दिले नाही. मी काय चोरी करायला गेली होती का?, आम्ही महापालिकेचे ट्रस्टी आहोत. असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तर नगरसेवक अजित गव्हाणे म्हणाले, श्वानांच्या निर्बीजीकरणात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्याच्या खोलात जावे. त्यातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी.

तर भाऊसाहेब भोईर यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया देताना म्हंटल आहे कि, लॉकडाऊन काळात सर्व जग बंद असताना महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने सुमारे साडेसात हजार श्वानाचे निर्बीजीकरण केले, या डॉक्टरांचा महापालिकेच्या प्रवेशद्वारावर सत्कार केला पाहिजे. नगरसेवक राहुल कलाटे म्हणाले, लॉकडाऊन काळात साडेसात हजार श्वानाचे निर्बीजीकरण कसे झाले हा संशोधनाचा विषय आहे. असे सांगणाऱ्या डॉक्टराचा तर पद्मश्री पुरस्काराने गौरवच केला पाहिजे. तर पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, स्वतःला कामे मिळाली नाहीत की आरोप केले जातात. वायसीएममध्ये कुणाचे ठेके आहेत. आम्हाला बोलायला भाग पाडू नका.

WhatsAppShare