पिंपरी-चिंचवडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना चौकीत नाही चौकात बसवणार – पोलीस आयुक्त

2072

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पीडित पोलिसांकडे येण्याआधी पोलिस पीडितांकडे पोहचले पाहिजेत यासाठी पोलिसांना चौकीत नाही तर शहराच्या चौकात बसवून कारवाईला गती आणि गुन्हेगारांवर आळा बसेल अशा प्रकारचे काम करणार असल्याची ग्वाही पिंपरी-चिंचवडचे नवनियुक्त पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी गुरुवारी (दि. १६) दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील उपस्थित होते.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे. मात्र पोलिसांच्या संख्येवर चांगले काम ठरत नसते. नेमके आणि योग्यरित्या काम केल्यास पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण परिसरातील गुन्हेगारी तसेच वाहतुकीचे प्रश्न सुटतील. त्यादिशेने मी माझे प्रयत्न सुरु केले असून सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हे नव्याने सुरु झाल्याने बऱ्याचशा अडचणी येत आहेत. मात्र त्या आडचणींवर मात करुन शहराची परिस्थिती सुधारणार आहे. शहरात गस्त आणि साध्या गणवेशातील पेट्रोलिंग वाढवणार आहे. त्यामुळे दोन ते तीन महिन्यांमध्येच फरक जाणवेल.

मागील काही काळात पिंपरी-चिंचवडमधून दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आयुक्तालयाच्या आधिपत्याखाली एक स्वतंत्र इंटेलिजन्स विभाग, पुणे आयुक्तालयाच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची एक अपडेटेड वेबसाईट लवकरच सुरु करणार करण्यात येईल. तसेच आयुक्तालयाच्या विविध उपक्रमात शहरातील नागरिकांना जास्तीत जास्त सहभागी करुन जनजागृती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.”

दरम्यान, पद्मनाभन यांनी यापूर्वी शिक्षण, पत्रकारिता, नक्षली भाग, महामार्ग वाहतूक नियोजन अशा विविध क्षेत्रात आणि विभागात काम केले आहे. त्यामुळे नागरिकांना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पिंपरी-चिंचवडकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.