पिंपरी-चिंचवडमधील एका पत्रकाराने भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याकडे मागितली २५ लाखांची खंडणी

142

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमधील एका वरिष्ठ पत्रकाराने भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्याला बदनामी करण्याच्या बातम्या देण्याची धमकी देऊन तब्बल २५ लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याने भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याला मोबाइलवरून खंडणी मागतानाचे रेकॉर्डिंग “पीसीबी”च्या हाती लागले आहे. या खंडणीखोर पत्रकारावर कडक कारवाई व्हावी यासाठी कायदेशीर बाबी तपासण्याचे काम सुरू असल्याचे भाजपच्या या माजी पदाधिकाऱ्याने “पीसीबी”शी बोलताना सांगितले. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. खंडणी मागणारा हा वरिष्ठ पत्रकार मूळचा सोलापूर जिल्ह्यातील आहे. त्याने यापूर्वी महापालिकेतील अनेक वरिष्ठ अधिकारी, राजकीय पुढारी, बिल्डर आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केले आहे. या पत्रकाराने आपल्या गावी खंडणीच्या पैशांतून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केल्याचे समजते.