पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी राहुल जाधव, तर उपमहापौरपदी सचिन चिंचवडे; राष्ट्रवादीचा पराभव

1510

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज भरणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेतली नाही. त्यामुळे या दोन्ही पदासाठी शनिवारी (दि. ४) निवडणूक घेण्यात आली. सत्ताधारी भाजपचे महापौरपदाचे उमेदवार राहुल जाधव यांना ८०, तर राष्ट्रवादीला ३३ मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे ३ नगरसेवक गैरहजर राहिले. भाजपचेही ३ नगरसेवक गैरहजर राहिले. त्यामुळे महापौरपदी भाजपचे राहुल जाधव विजयी झाले. उपमहापौरपदासाठीही घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपच्या सचिन चिंचवडे यांना ७९, तर राष्ट्रवादीला ३३ मते मिळाली. त्यामुळे उपमहापौरपदी सचिन चिंचवडे यांनी निवड झाली. या निवडणुकीत मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांनी भाजपला मतदान केले. तर शिवसेनेचे ९ नगरसेवक तटस्थ राहिले.   

 मावळते महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्यामुळे या दोन्ही पदाच्या निवडीसाठी शनिवारी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रशासकीय प्रक्रिया पार पाडण्यात आली. महापालिकेत भाजप बहुमतात आहे. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर भाजपचाच होणार हे स्पष्ट होते.

महापौरपदासाठी भाजपकडून राहुल जाधव यांनी, तर उपमहापौरपदासाठी भाजपच्याच सचिन चिंचवडे यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेही उमेदवारी अर्ज भरून महापौर आणि उपमहापौर निवडीत रंगत आणली होती. राष्ट्रवादीकडे संख्याबळ नसल्याने दोन्ही पदासाठी भरलेले उमेदवारी अर्ज माघार घ्यावेत, यासाठी भाजपने शेवटपर्यंत प्रयत्न केले. राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करून उमेदवारी अर्ज माघारी घ्यावेत, अशी विनंती भाजपकडून करण्यात आली होती. परंतु, राष्ट्रवादीने महापौर आणि उपमहापौरपदासाठी भरलेले उमेदवारी अर्ज माघारी न घेता निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे महापौर आणि उपमहापौरपदासाठी मतदान घेण्यात आले. सभेच्या पीठासीन अधिकारी नयना गुंडे यांनी सकाळी अकरा वाजता आधी महापौर निवडीची प्रक्रिया पार पाडली. या पदासाठी आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी केल्यानंतर त्यांनी कोणाला आपली उमेदवारी मागे घ्यायची असल्यास १५ मिनिटांचा अवधी दिला. कोणीच माघार न घेतल्याने मतदान घेण्यात आले. भाजपचे महापौरपदाचे उमेदवार राहुल जाधव यांना भाजपची ७७ आणि अपक्ष ३ अशी एकूण ८० मते मिळाली. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला ३३ मते मिळाली. त्यामुळे महापौरपदी भाजपचे राहुल जाधव विजयी झाले.

 

 

 

 

 

 

त्यानंतर उपमहापौरपदासाठी महापौरपदासारखीच निवड प्रक्रिया राबवण्यात आली. उमेदवारी अर्ज छाननीनंतर तो मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला. राष्ट्रवादीने माघार न घेतल्यामुळे मतदान घेण्यात आले. भाजपच्या सचिन चिंचवडे यांना ७९ मते, तर राष्ट्रवादीला ३३ मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे ३ नगरसेवक गैरहजर राहिले. त्यामुळे उपमहापौरपदी सचिन चिंचवडे यांची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना तटस्थ राहिली. तर मनसेचे नगरसेवक सचिन चिखले यांनी भाजपला मतदान केले.