पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी कोण? शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, संतोष लोंढे, राहुल जाधव की शशिकांत कदम

1771

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी मंगळवारी (दि. २४) पदाचे राजीनामे दिले. त्यामुळे शहराला आता नवीन महापौर आणि उपमहापौर मिळणार आहेत. विशेषतः महापौरपदी भाजपच्या कोणत्या नगरसेवकाची वर्णी लागते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. महापौरपद हे ओबीसीसाठी राखीव आहे. नव्या महापौरांच्या कार्यकाळातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे महापौरपदी मूळ ओबीसी की कुणबी ओबीसी नगरसेवकाची निवड केली जाते, हे पाहणे राजकीयदृष्ट्या औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान महापौरपदासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके, शशिकांत कदम, भोसरी विधानसभा मतदारसंघातील राहुल जाधव, संतोष लोंढे यांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी राहुल जाधव यांचे पारडे जड मानले जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद इतर मागासवर्गासाठी (ओबीसी) राखीव आहे. महापालिकेच्या निवडणूक प्रभाग रचनेत ओबीसीसाठी राखीव जागेवरून निवडून आलेल्या किंवा ओबीसी असूनही खुल्या जागेवर निवडून आलेल्या नगरसेवकाला महापौरपदावर विराजमान होता येते. महापालिकेत ज्या पक्षाची सत्ता त्या पक्षाचा ओबीसी नगरसेवक या पदावर बसू शकतो. त्यानुसार महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे प्रथमच सत्ता स्थापन केलेल्या भाजपने पहिल्या वर्षी भोसरी विधानसभा मतदारसंघातील आणि आमदार महेश लांडगे यांचे जवळचे नातेवाइक असलेल्या नितीन काळजे यांना संधी दिली. आमदार लांडगे यांनी महापौरपदासाठी हट्ट धरून टोकाची भूमिका घेण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे महापौरपदाची माळ काळजे यांच्या गळ्यात पडल्याचे बोलले जाते.

नितीन काळजे हे मराठा समाजातील आहेत. परंतु, त्यांनी निवडणुकीसाठी मराठा कुणबीचे ओबीसी प्रमाणपत्र आणून ओबीसी जागेवरून निवडणूक लढविली आणि विजय मिळविला. काळजे यांना महापौर करण्यासाठी मूळ ओबीसीतील भाजपच्या नगरसेवकांनी कडवा विरोध केला होता. हे पद मूळ ओबीसी नगरसेवकालाच मिळाले पाहिजे, अशी त्यांची मागणी होती. परंतु, पक्षनेतृत्वाने त्याकडे दुर्लक्ष करून काळजे यांनाच महापौर केले. त्यामुळे शहरातील ओबीसी समाजात नाराजी पसरली आहे. शहरात माळी समाजाचे दुसऱ्या क्रमांकाचे मतदान आहे. या समाजाचे अनेक नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे आता भाजप माळी समाजाला न्याया देईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

महापौर नितीन काळजे यांचा सव्वा वर्षांचा कालावधी संपल्यामुळे त्यांनी आणि त्यांच्यासोबत उपमहापौर शैलजा मोरे यांनी आपल्या पदाचे मंगळवारी राजीनामे दिले. आता एक-दोन आठवड्यात महापौर आणि उपमहापौर निवडण्यासाठी निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली जाईल. नव्या महापौरपदाच्या कार्यकाळात भाजपला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे महापौरपदी अभ्यासू आणि सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या नगरसेवकाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. ही संधी कोणाला मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान महापौरपदासाठी भोसरी विधानसभा मतदारसंघातील राहुल जाधव, संतोष लोंढे आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम यांची नावे चर्चेत आहेत. त्यातील राहुल जाधव यांचे पारडे जड मानले जात आहे. परंतु, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापौरपद चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी खेचून आणल्यास शत्रुघ्न काटे आणि नामदेव ढाके यांच्यात चुरस असणार आहे. महापालिकेत सत्ता आल्यापासून आमदार जगताप यांनी धक्कातंत्राच्या राजकारणाचा अवलंब केला आहे. स्थायी समितीचा अध्यक्ष निवडताना आमदार जगताप यांनी असाच धक्कातंत्र वापरला. आता महापौरपदाची निवड करतानाही आमदार जगताप अशाच राजकीय धक्कातंत्राचा वापर करणार का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.