‘पिंपरी चिंचवडचे राजकारण कात टाकतेय…’ – थर्ड आय – अविनाश चिलेकर

363

पिंपरी चिंचवड शहर स्थापनेच्यावेळी दरडोई सर्वाधिक जकात महसूल होता म्हणून आशिया खंडातील श्रीमंत नगरी हा पहिला बहुमान मिळाला होता. शेकडो मोठे आणि सुमारे १० हजार मध्यम व लघुउद्योगांची यंत्र सतत धडधडत होती म्हणून उद्योग नगरी म्हणून ख्याती झाली. सुमारे ५-७ लाख लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार दिला म्हणून श्रमिकांची नगरी अशी ओळख निर्माण झाली. टाटा, बजाज, मर्सिडीस बेंझ, फियाट, फोक्सवॅगन, जेसीबी अशा देशी आणि विदेशी वाहन कंपन्यांमुळे हे शहर ऑटोहब म्हणून समोर आले. १९९० च्या दशकापासून हिंजवडी व तळवडे आयटी पार्कमुळे सायबर सिटी अशी जगाच्या नकाशावर ओळख झाली. देशात सर्वाधिक वेगाने वाढणारे आणि इथे येणाऱ्या प्रत्येकाला काम देणारे म्हणून हे संधीचे शहर बनले. स्वच्छतेबाबत सर्वोत्ष्ठ कामगिरी केली म्हणून बेस्ट सिटी पुस्काराने गौरविण्यात आले. नरेंद्र मोदींच्या काळात ही एक सुंदर अशी स्मार्ट सिटी झाली. आगामी २५-३० वर्षांचा विचार केला तर मुंबई – पुणे खालोखाल अत्यंत महत्वाचे शहर कोणते असेल तर पिंपरी चिंचवडचे नाव घ्यावे लागेल. आकुर्डी, भोसरी, पिंपरी आणि चिंचवड या चार ग्रामपंचायतींचे मिळून पुण्याचे जुळे भावंड म्हणून ५० वर्षांपूर्वी जन्माला आलेले पिंपरी चिंचवड शहर आज एक महानगर झाले. या मातीने अनेक रंग पाहिले. डाव्या विचारांच्या नेत्यांनी चळवळी, मोर्चे, आंदोलनांनी ढवळून काढले होते म्हणून या शहराचा रंग लाल होता.

शिवेसेनेचे दोन -दोन खासदार, महापालिकेत भाजपाची सत्ता येताच शहराची भगवी किनार गर्द झाली. खूप काही एकदम झपाट्याने बदलले. गाव, ग्रामपंचायत, गाव चावडी सगळे इतिहासजमा झाले. पूर्वीचे गल्लीबोळ गेले आणि सिमेंटचे वा डांबराचे मोठे मोठे रस्ते आले. हिरवेगार शेत गेले आणि सिमेंटचे जंगल झाले. चाळ व चाळ संस्कृती संपली आणि हजार-पाचशे अलिशान फ्लॅटच्या हाऊसिंग सोसायट्या उभ्या राहिल्या. मागोवा घेतला तर कितीतरी स्थिंत्यंतर झाले. खंत फक्त एकाच गोष्टिची आहे, ती म्हणजे इथले राजकारण आजही नाही बदलले. पुलाखालून बरेच पाणी गेले, पण तोच ग्रामिण बाज, तोच सरपंची खाक्या, तेच गाव पुढारी, तेच छक्केपंजे आणि डावपेच आजही या मातीत कायम आहेत. खोट्या शहरी वातावरणात एका अर्थाने आजही गावपण खूप चांगले वाटते पण, गावगुंडी नको वाटते. आजवर १९७८ च्या नगरपालिकेचा अपवाद वगळता नंतर १९८६, १९९२, १९९७, २००२, २००७, २०१२, २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकांवर आणि पुढे महापौर- उपमहापौर तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या यादीवर नजर टाकली तर चित्र स्पष्ट दिसते की गावकी पूर्वीही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार. शहर ग्लोबल झाले, पण इथले बहुसंख्य पुढारी लोकलच राहिले. आज हे बहुभाषिक शहर आहे, मिनी इंडियाचे रुप आहे, पण इथे तिरुमनी, आसवाणी, बहल, कुमार, देव, नायर, यादव, शर्मा, वर्मा, गोयल, सांकला, गादिया, खिंवसरा, चोरडिया, धारिया, लोबो, खान, शेख हे लायकी असूनही नेते होऊ शकले नाहीत. परप्रांतीयांची संख्या या शहरात ३०-४० टक्के आहे, पण महापालिकेत ३-४ सुध्दा नाहीत. दिवंगत प्रा. रामकृष्ण मोरे सर, बारामतीकर अजित पवार यांनी इथे राज्य केले पण त्यांनाही गावपुढाऱ्यांचीच मिनतवारी करावी लागली. शिवेसनेने गाववाला आणि बाहेरचा या वादात स्वतःचा खुंटा मजबूत केला, पण आज शिवसेनेचीच गावसेना झाली. भाजपाचा मूळचा मतदार हा परप्रांतीय. इथे सत्तेचे राजकारण करण्यासाठी फडणवीस यांनाही जगताप, लांडगे यांच्याशिवाय पर्याय सापडला नाही. गेल्या तीस वर्षांतील शहर भाजपा अध्यक्षांपैकी मामनचंद आगरवाल, वसंत वाणी, डॉ. प्रतिभा लोखंडे यांना केव्हाच गाशा गुंडाळावा लागला, कारण गावकी बरोबरीला नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसने २० वर्षे इथे एकहाती राज्य केले, पण गावकीशिवाय त्यांचेही पान हालले नाही. गावकीतील नवी पिढी काही अंशी काळानुसार बदलली, पण जुनी खोंड आजही सूंभ जळाला तरी पिळ कायम, अशा भुमिकेत आहेत. आज या शहराच्या राजकारणत ज्यांना कोणाला भक्कम पाय रोवायचा आहेत त्यांना इथेच खरी संधी आहे. या गावकीच्या राजकारणातून खूप मोठी फट निर्माण झाली आहे, ती रुंदावत जाऊन एक नवे स्मार्ट राजकारण नावारुपाला येऊ शकते. त्यासाठी एक ग्लोबल विचारांचा, अभ्यासू, धाडसी, आक्रमक, स्वच्छ चारित्राचा, नवा कोरा चेहरा पाहिजे आहे. सर्वसमावेशक नेता नसल्याने नेतृत्वहिन झालेल्या या शहरातील जनतेची ती मोठी भूक आहे.

भाजपाला पाच वर्षांत त्यासाठीच लोकांनी एक संधी दिली होती, पण त्यांनी त्याची माती केली. राष्ट्रवादीला पर्याय म्हणून लोकांनी निवडले पण ते राष्ट्रवादीचेही बाप निघाले. आता यापूर्वी झालेल्या चुका दुरुस्त करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न दिसतोय. या शहरात इतके काम करूनही पराभव का झाला याचे आत्मपरिक्षण केल्यावर राजकारणातील बदललेल्या अपेक्षांवर स्वतः अजित पवार अभ्यास करत आहेत. ७०-८० टक्के नवे कोरे चेहरे द्यायचे, भाजपाने ज्या गुणवंतांना डावलले त्यांना चुचकारायचे, गावकीला बखोटीला मारून यापुढचे राजकारण करायचे, अशी राष्ट्रवादीची व्युहरचना दिसते. राष्ट्रवादी आता काटकोनात नाही तर १८० अंशात बदलली आहे. दुसरीकडे भाजपाची राष्ट्रवादी आता झाली आहे. शहरातील हजारो नागरिकांना या शहराबद्दल प्रचंड आपुलकी आहे. या मातीसाठी आयुष्य वेचलेले ते पिंपरी चिंचवडकर काही चांगले करू इच्छितात. ते सगळे फक्त संधीच्या शोधात आहेत. थोडक्यात येत्या सार्वत्रिक निवडणुकित या शहराचे राजकारण त्या अंगाने कात टाकेल अशी अपेक्षा आहे. महापालिका निवडणुका ही त्यासाठीची एक सुवर्णसंधी असेल.

WhatsAppShare