पिंपरी-चिंचवडचे महापौर आणि उपमहापौर ३१ जुलैला ठरणार; विभागीय आयुक्तांनी ४ ऑगस्टला बोलाविली विशेष सर्वसाधारण सभा

370

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी पदाचे राजीनामे दिल्यानंतर आता येत्या ४ ऑगस्ट रोजी नवीन महापौर आणि उपमहापौर निवडण्यात येणार आहे. त्यासाठी ४ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याआधी मंगळवारी म्हणजे ३१ जुलै रोजी महापौर आणि उपमहापौरपदासाठी दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपकडून महापौरपदासाठी जो कोणी अर्ज भरेल, तो महापौर होणार हे मंगळवारीच स्पष्ट होणार आहे. विशेष सर्वसाधारण सभेत आधी महापौरपदासाठी आणि नंतर उपमहापौरपदासाठी निवडीची प्रशासकीय प्रक्रिया पार पाडली जाईल, असे नगरसचिव उल्हास जगताप यांनी सांगितले.

महापालिकेचे महापौरपद अडीच वर्षासाठी ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. महापालिकेत प्रथमच सत्ता मिळालेल्या भाजपने महापौरपदावर सव्वा-सव्वा वर्षासाठी दोन नगरसेवकांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भाजपचे प्रथम महापौर नितीन काळजे यांचा सव्वा वर्षांचा कार्यकाल संपल्यामुळे मंगळवारी (दि. २४) त्यांनी पदाचा राजीनामा दिला. महापौरपदासोबत उपमहापौरही बदलण्यात येणार असल्यामुळे उपमहापौर शैलजा मोरे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता नवीन महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार ही प्रक्रिया पार पाडावी लागते. त्यामुळे महापौर आणि उपमहापौरांनी राजीनामा दिल्यानंतर महापालिकेच्या नगरसचिव विभागाने नवीन महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयासोबत बुधवारी (दि. २५) तातडीने पत्रव्यवहार केला. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी येत्या ४ ऑगस्ट रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्याचे पत्र दिल्याचे महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी सांगितले. तसेच येत्या मंगळवारी म्हणजे ३१ जुलै रोजी महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदाचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दुपारी तीन ते पाच ही मुदत देण्यात आली आहे.

त्यानुसार महापालिका प्रशासनाने येत्या ४ ऑगस्ट रोजी विशेष सर्वासाधारण सभेचे आयोजन केले आहे. सकाळी अकरा वाजता ही सभा बोलाविण्यात आल्याचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी सांगितले. महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी आयोजित केलेल्या या विशेष सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्तांनी पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष नयना गुंडे यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. आधी महापौरांची आणि नंतर उपमहापौरांची निवड केली जाईल.

दरम्यान, महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. १२८ पैकी ७७ नगरसेवक भाजपचे आहेत. तसेच ५ अपक्षांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महापालिकेच्या सभागृहात भाजपकडे ८२ नगरसेवकांचे पाठबळ आहे. त्यामुळे महापौर आणि उपमहापौरांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. ओबीसीसाठी राखीव असलेले महापौरपदी भाजपच्या कोणत्या नगरसेवकाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापौरपदासाठी देव पाण्यात घातलेल्या ओबीसी नगरसेवकांनी राजकीय फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे महापौरपदाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.