पिंपरी-चिंचवडचे पोलिस जागे झाले, वाहनचोऱ्या रोखण्यासाठी सरसावले – गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष पथकाची स्थापना

33

पिंपरी, दि. 27 (पीसीबी) : पिंपरी- चिंचवड शहरात वाहन चोरटयांनी अक्षरशः धुमाकुळ घातला आहे. मात्र, या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिस आता सरसावले आहेत. पोलिसांनी रात्रगस्तीमध्ये वाढ करून विशेष उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. तसेच, या गुन्ह्याच्या तपासासाठी एका विशेष पथकाची स्थापना देखील करण्यात आली आहे. रोज सरासरी 5 वाहने चोरी होत असल्याने नागरिक त्रस्त होते.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. मात्र, वाहन चोरट्यांना लगाम लावण्यात पोलिसांना यश मिळाले नाही. मागील सहा महिन्यात शहर परिसरातून एकूण ६१० वाहने चोरीला गेली आहेत. यातील केवळ १८ टक्के म्हणजे ११ वाहने पोलिसांना सापडली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा २४५ गुन्हे वाढले आहेत. 

वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी सात कर्मचारी व दोन अधिकाऱ्यांचे एक ‘वाहन चोरी विरोधी पथक’ सुरु करण्यात आले होते. या पथकांमध्ये पोलीस ठाण्यातील निवडक कर्मचारी प्रतिनियुक्तीवर घेण्यात आले होते. पथकाांतील पोलिसांनी काही किचकट गुन्ह्यांचा छडा देखील लावल्याची नोंद  आहे. मात्र, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर तैनात केलेल्या बंदोबस्तासाठी पोलीस कमी पडू लागल्याने पथके तापुरत्या स्वरूपात बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी पोलीस आयुक्तालयातील एटीएम फोडीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली एसआयटी आणि वाहन चोरी विरोधी पथक बरखास्त करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, वाहन चोरटयांनी पुन्हा एकदा शहरात धुमाकूळ घातल्याने वाहन चोरी विरोधी पथकाची गरज भासू लागली. त्यामुळे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी हे पथक पुन्हा नव्याने सुरु केले. सहायक निरीक्षक दर्जाचे अधिकारी या पथकाचे प्रमुख असून खबरी नेटवर्क स्ट्रॉंग असलेले दहा कर्मचाऱ्यांची या पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांना या पथकाचे रिपोर्टींग असणार आहे.   

असे आहे वाहन चोरी विरोधी पथक :-

सहायक पोलिस निरीक्षक अंबरीश देशमुख – गुन्हे शाखा युनिट ४ 
पोलीस हवालदार संदीप गवारी – वाकड पोलिस ठाणे 
पोलिस हवालदार भीमराव बोरुडे – वाहतूक विभाग 
पोलिस नाईक प्रमोद हिरळकर – गुन्हे शाखा, युनिट १ 
पोलिस नाईक विपुल जाधव – गुन्हे शाखा, युनिट २ 
पोलिस शिपाई जगदीश बुधवंत – गुन्हे शाखा, युनिट- ३ 
पोलिस नाईक लक्ष्मण आढारी – गुन्हे शाखा, युनिट- ४ 
पोलिस नाईक नामदेव वडेकर – वाहतूक विभाग 
पोलिस शिपाई शामसुंदर गुट्टे – गुन्हे शाखा, युनिट ५ 
पोलिस नाईक व्ही. आर. नलगे – खंडणी विरोधी पथक 
पोलिस शिपाई अरुण साबळे – वाहतूक विभाग 
———–

शहरातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या सूचनेनुसार या पथकाची पुन्हा स्थापना करण्यात आली आहे. किचकट गुन्ह्यांचा उलगडा करणे, हा पथक स्थापनेचा मुख्य हेतू आहे. या व्यतिरिक्त आरोपींच्या मोडस ऑपरेंडीचा अभ्यास करून गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पथक प्रयत्न करणार आहे. 

WhatsAppShare