पिंपरी-चिंचवडमधील बहुतांश प्रलंबित प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत. त्याची कुणकुण लागल्यामुळेच राष्ट्रवादीने या प्रश्नांवर हल्लाबोल आंदोलन केले आणि आता शिवसेना आंदोलनाच्या तयारीत आहे. शहरातील खासदारांनी केंद्र सरकारशी निगडीत प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असा हल्लाबोल भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी खासदार श्रीरंग बारणे यांचे नाव न घेता केला. जनतेने संधी दिलेल्या वेळेत आम्ही सर्व प्रश्न सोडवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

आमदार लक्ष्मण जगताप यांनी गुरूवारी महापालिकेत पत्रकार परिषद घेऊन ऊठसूठ महापालिकेच्या प्रश्नांवर बोलणाऱ्या शिवसेनेच्या खासदारांना लक्ष्य केले. यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आदी उपस्थित होते.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “अनधिकृत बांधकामांना शास्तीकर आकारण्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असताना कायदा झाला आहे. भाजप सरकारने ६०० चौरस फुटापर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना शास्तीकरातून वगळण्याचा कायदा केला आहे. परंतु, आतापर्यंतचा शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्यासाठी पुन्हा कायदा करावा लागणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया मोठी आहे. ही प्रक्रियाच खासदारांना कळत नाही. ऊठसूठ याच प्रश्नांवर ते टिका करत आहेत. शास्तीकर माफ करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. याशिवाय शहराचे अन्य प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी देखील आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. त्यामुळे हे सर्व प्रश्न लवकरच सुटण्याच्या मार्गावर आहेत.

त्याची विरोधकांना कुणकुण लागली आहे. त्यामुळे ज्यांच्या काळात हे प्रश्न निर्माण झाले त्या राष्ट्रवादीने हल्लाबोल आंदोलन केले. आता शिवसेना आंदोलनाच्या तयारीत आहे. शहराच्या खासदारांनी केंद्र सरकारशी निगडीत शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करावा. खासदार रेडझोनच्या प्रश्नांवर काहीच बोलत नाहीत. एच. ए. कंपनीचा प्रश्नही तसाच प्रलंबित राहिला आहे. तरीही खासदार ऊठसूठ स्थानिक प्रश्नांवरच बोलत आहेत. येथील स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. जनतेने दिलेल्या वेळेत हे प्रश्न नक्की सोडवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”