पिंपरी चिंचवडकारांनी काळजी घ्या – पार्थ पवार

97

पिंपरी, दि. 6 (पीसीबी): पिंपरी चिंचवड शहरात ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. रुग्ण आढळले असले तरी घाबरून न जाता काळजी घेणे आवश्यक आहे या पार्श्वभूमीवर युवा नेते पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवडकारांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

24 नोव्हेंबर 2021 रोजी नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी 44 वर्षीय महिला तिच्या दोन मुलींना घेऊन आली होती. त्या तिघींना ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. तसेच त्या महिलेचा भाऊ आणि त्याच्या दोन मुलींना देखील ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचे नॅशनल केमिकल लॅबोरटरीच्या अहवालाने सिध्द झाले आहे.

त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात या व्हेरियंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक झाली आहे. त्याचबरोबर पुणे शहर आणि आळंदी येथे देखील प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवडकरांना काळजी घेण्याचे आवाहन करत ट्विट केले आहे. त्यात पार्थ पवार यांनी म्हटलं आहे की, पिंपरी चिंचवड शहरात ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झालेले सहा आणि पुणे शहरात एक रुग्ण आढळले आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी. कोविड संबंधित सर्व उपाययोजनांचा अवलंब करावा. घाबरण्याचे कारण नाही. लसीकरण करणे हाच यावर सर्वात प्रभावी उपाय असल्याचेही पार्थ पवार यांनी म्हटले आहे.