पिंपरीत युवक राष्ट्रवादी जोमात; भाजप, काँग्रेस आणि शिवसेना युवक आघाडीत चाललेय काय?

95

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीत आलेल्या शिथीलतेमुळे युवक आघाडीचे महत्त्व वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत युवक राष्ट्रवादी अधिक सक्रिय आणि आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे सत्ताधारी भाजपची युवक आघाडी केवळ नामधारी असल्याचे चित्र आहे. शहरात राष्ट्रवादीची युवक आघाडी जोमात आणि भाजपची युवक आघाडी कोमात, अशी परिस्थिती आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस आणि शिवसेनेची युवक आघाडी अस्तित्वात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेला त्याची किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे.

भाजपने महापालिका काबिज करून संपूर्ण शहरावर ताबा घेतल्यानंतर एकेकाळी निर्विवाद वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रवादीला खिंडार पडत गेले. अनेक महत्त्वाचे शिलेदार भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीत मोठी पोकळी निर्माण झाली ती अद्याप भरून निघालेली नाही. आमदार अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना पक्षात स्थिरता आणणे शक्य झालेले नाही. शहरात राष्ट्रवादीची ताकद असूनही ती दखलपात्र नाही. सर्व प्रमुख नेते भाजपवासी झाल्यामुळे तसेच जे पक्षात आहेत, ते स्वतःपुरतेच विचार करणारे असल्यामुळे राष्ट्रवादी खिळखिळी झाली.

खरे तर या काळात नव्या तरूणांना संधी देऊन पक्षाला उभारी देण्याची संधी होती. पण त्यादृष्टीने वरिष्ठांकडून कोणतीही पावले टाकली गेली नाहीत. त्यामुळे पक्ष बॅकफुटवर जात राहिला. तीन नगरसेवक असताना भाजपने तळागाळापर्यंत आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना रोखण्याची ताकद राष्ट्रवादी दाखवू शकली नाही. काँग्रेसला सोबत घेऊन ते शक्य होते. पण आघाडी करायची की नाही, या गोंधळात राष्ट्रवादी आपले अस्तित्वच हरवत चालली आहे.

गेल्या वर्षभरात राष्ट्रवादी विविध आंदोलनांच्या माध्यमातून सतत चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहे. महापालिकेपासून ते तहसिल कार्यालयापर्यंत मोर्चेही काढले. परंतु, राष्ट्रवादी युवक आघाडीची कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पक्षातील मरगळ झटकत असल्याचे चित्र आहे. युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी स्वतः शहरात चार-पाच वेळा दौरा केला. त्यामुळे युवक आघाडी जोमात आणि त्या तुलनेत वरिष्ठ राष्ट्रवादी कोमातच असल्याचे चित्र आहे. युवक आघाडीचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रश्नांवर होणाऱ्या आंदोलनांमुळे राष्ट्रवादी दखलपात्र ठरू लागली आहे. अनेक वरिष्ठ नगरसेवक पक्षाच्या आंदोलनांकडे पाठ फिरवत असताना राष्ट्रवादीची युवक आघाडी मात्र पक्षात जान फुंकण्याचा प्रयत्न करत आहे.

राष्ट्रवादीची युवक आघाडी जोमात असताना सत्ताधारी भाजपची युवक आघाडी मात्र केवळ नामधारी असल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या युवक आघाडीचे नेतृत्व नगरसेवक रवि लांडगे यांच्या खांद्यावर आहे. त्यांना भाजपचे माजी शहराध्यक्ष कै. अंकुशराव लांडगे यांचा वारसा लाभला आहे. परंतु, रवि लांडगे यांना सत्ताधारी पक्षाच्या युवक आघाडीचे शहराध्यक्ष म्हणून फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. भाजपची युवक आघाडी पक्षाच्या ध्येय धोरणांवर काम करताना दिसत नाही. त्यावरून भाजपमध्ये काय सुरू आहे, याचा अंदाज येऊ शकतो. सध्या सत्तेची ऊब मिळत असल्यामुळे युवक आघाडीच्या बांधणीकडे पक्षाचे दुर्लक्ष झाले आहे. युवक आघाडी सक्षम नसणे भाजपला आगामी काळात महागात पडू शकते.

राष्ट्रवादीपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या युवक आघाडीचे शहरात अस्तित्व नसल्याचे चित्र आहे. शिवसेनेने यापूर्वीही शहरात युवक आघाडी सक्षम होऊ दिली नाही आणि यापुढेही ती होऊ दिली जाणार नाही, असेच दिसून येत आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या युवक आघाडीचीही शिवसेनेसारखीच परिस्थिती आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे हे शहरात कसाबसा पक्ष टिकवण्याचा आटापिटा करत आहेत. काँग्रेसकडे युवकांचा ओढा कमी असल्यामुळे पक्षाची युवक आघाडी अस्तित्वातच नसल्यासारखी स्थिती आहे. यावर शिवसेना आणि काँग्रेसने आताच रामबाण उपाय शोधला नाही, तर आगामी निवडणुकांमध्ये या दोन्ही पक्षांवर सध्या आहे त्याच परिस्थितीत राहण्याची वेळ येऊ शकते.