पिंपरीत मौजमजेसाठी दुचाकी चोरणारे तीघे अटकेत; ३० लाखाच्या ११ दुचाकी जप्त

86

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – मौजमजा करण्यासाठी सराईत गुन्हेगाराने वाकड, हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या ३० लाख ३० हजार रुपये किंमतीच्या ११ दुचाकी पोलिसांनी जप्त  केल्या आहेत. या प्रकरणी दोन अल्पवयीन गुन्हेगारासह तीघांना अटक करण्यात आली आहे.

अरबाज बशीर शेख (वय २१, रा. गहूंजे) यांच्यासह त्यांच्या दोन साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव परिसरातून वाहन चोरी होत असल्याने वाकडचे तपासी पथक चोरट्याच्या मागावर होते. दरम्यान, एका वाहनचोरट्यांची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून अरबाज याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने दुचाकी चोरल्याची कबूली दिली.

दरम्यान, या तिघांनी वाकडमधून पाच आणि हिंजवडीपरिसरातून सहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी या ११ दुचाकी जप्त केल्या आहेत. अरबाज हा मौजमजेसाठी दुचाकी चोरत होता. पेट्रोल संपल्यानंतर दुचाकी सोडून तो निघून जात होता. काही दुचाकी ओळखीच्यांना विकल्या होत्या. अरबाज याच्यावर तळेगाव दाभाडे येथे दरोडा आणि देहूरोड येथे खून करण्याच्या हेतूने अपहरण करणे, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिस तपास करत आहेत.