पिंपरीत महापौर निवडीनंतर महापालिका परिसरात भंडारा उधळणाऱ्या २०० जणांवर गुन्हा

1303

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि.४) एकच जल्लोष करत महापालिका परिसरात उत्साहाच्या भरात ५० ते ६० पोते भंडारा जेसीबीवर उभे राहून उधळला होता. यामुळे परिसरात भंडाऱ्याचा थर साचला होता. त्यात पाऊस होऊन त्याचा चिखल झाला. यामुळे महापालिकेत येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

भंडारा ओला होऊन झालेल्या चिखलामुळे त्यावरुन आठ ते दहा वाहने घसरली, तर पायी चालणाऱ्यांचा तोलही गेला, यामध्ये एका दिव्यांगाचाही समावेश होता. याबाबत महापालिकेच्या कर्मचाऱ्याने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार २०० अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.