पिंपरीतून देशी बनावटीच्या पिस्तुलासह दोन जिवंत काडतुस जप्त; दोघांना अटक

744

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – देशी बनावटीचे एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.  ही कारवाई मंगळवारी (दि.७) रात्री दहाच्या सुमारास पिंपरी पोलिसांनी भाटनगर कमाणीजवळ केली.

विकास कांबळे (वय २८, रा. पत्राशेड, पिंपरी) आणि अमीर उर्फ राजा युसुफ शेख (वय १८, रा. बौद्धनगर, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील भाटनगर येथे दोनजण दुचाकीवरून आले असून त्यांच्याजवळ पिस्तुल असल्याची खात्रीशीर माहिती पिंपरी पोलिसांना त्यांच्या खबऱ्या मार्फत मिळाली होती. त्यानुसार पिंपरी पोलिसांनी सापळा रचून भाटनगर कमाणीजवळ उभे असलेल्या विकास आणि अमीर या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. यावरून दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी हे पिस्तुल कोणाला विकण्यासाठी आणले होते कि काही घातपात करण्यासाठी हे अद्याप समजू शकलेले नाही. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.