पिंपरीतील विठ्ठलनगरमध्ये महिलेने केले तरुणावर कुऱ्हाडीने वार

1710

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत सत्त होणाऱ्या भांडणाला कंटाळून महिलेने तरुणाच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करुन त्याला गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी (दि.३) रात्री सातच्या सुमारास विठ्ठनगरमधील इमारत क्र.१ येथील चौथ्या मजल्यावर घडली.

प्रविण भागवत (वय ३०, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात सविता जाधव या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता आणि प्रवीण हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ते विठ्ठलनगरमधील इमारत क्र.१ येथील चौथ्या मजल्यावर शेजारी-शेजारी राहतात. मागील काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये किरकोळ कारणांवरून सत्त भांडण होत होते. सोमवारी प्रवीण हा दारु पिऊन आला होता. यादरम्यान त्याचे आणि सविताचे पुन्हा कडाक्याचे भांडण सुरु झाले. यावर संतापलेल्या सविताने घरातील कुऱ्हाडीने प्रविण याच्या मानेवर प्राणघातक वार केले. यामुळे तो गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. शेजारील नागरिकांनी प्रविणला तात्काळ वायसीएम रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्या मानेच्या नसा तुटल्या असल्याचे सांगितले असून त्याची प्रकृती चिंताजणक आहे.  आरोपी सविता ही विवाहित असून तीला दोन मुल आहेत. पोलिसांनी अद्याप तिला अटक केलेले नाही. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.