पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न

51

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – दिवसा ढवळ्या पिंपरी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (वायसीएम) दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन एका रुग्णाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना  सोमवारी (दि.४) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

परशुराम गणेश शिंदे  (वय २९, रा. नाणेकरचाळ, पिंपरी) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. दारुच्या आहारी गेल्यामुळे त्यांच्यावर वायसीएममध्ये उपचार सुरु होते.

प्राप्त  माहितीनुसार, परशुराम याला दारुचे व्यसन आहे. यावर उपचार घेण्यासाठी त्याला पिंपरी संत तुकारामनगर येथील पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात रविवारी (दि.३) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर तिसऱ्या मजल्यावरील वॅार्डा क्र. ३०२ मध्ये उपचार सुरु होते. मात्र, मंगळवारी (दि.४) त्याने रुग्णालयातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तसेच रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, खाली ठेवलेल्या  कचरा कुंडीत तो पडल्याने त्याचा जीव वाचला.  या घटनेमध्ये परशुराम याचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले असून डोळ्यासह तोंडाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर सध्या वायसीएम रुग्णालयातच उपचार सुरू आहेत.

दरम्यान दिवसा ढवळ्या रुग्णालयाच्या इमारतीवरुनच रुग्णाने आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे वायसीएम रुग्णालयाची सुरक्षा रामभरोसे  असल्याचे समोर आले आहे.