पिंपरीतील महेशनगर मध्ये तरुणावर कोयत्याने वार करुन जीवेठार मारण्याचा प्रयत्न

142

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – पूर्ववैमनस्यातून एका १९ वर्षीय तरुणावर टोळक्यांनी कोयत्याने वार करुन जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना आज (गुरुवार) दुपारी एकच्या सुमारास पिंपरीतील महेश नगर येथे घडली.

मयूर जाधव (वय १९, रा. नेहरू नगर, पिंपरी) असे कोयत्याचे वार होऊन गंभीर जखमी  झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर जाधव (वय ३१, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (गुरुवार) दुपारी एकच्या सुमारास मयूर हा त्याच्या दुचाकीवरुन महेश नगर येथे गेला होता. यावेळी तो महेशनगर येथे थांबला असता काही अज्ञात टोळक्यांनी त्याच्यावर कोयत्याने जबर वार केले. या घटनेत याच्या पायावर, हातावर आणि डोक्यात गंभीर वार झाले आहेत. त्याला उपचारासाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या चिंताजणक आहे. पिंपरी पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.